कृषीवलच्या दणक्याने अधिकार्यांची पळापळ
| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरान पालिकेने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने माथेरान शहरात पायलट प्रकल्प राबविण्यासाठी पर्यावरणपूरक ई-रिक्षा खरेदी केल्या होत्या. त्या सात ई-रिक्षांपैकी दोन रिक्षा शहरातून गायब होत्या. त्याबाबत ‘कृषीवल’मध्ये 23 डिसेंबर रोजी बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर दुरुस्तीसाठी पनवेल येथे पाठवण्यात आलेली ई-रिक्षा अगदी सकाळी माथेरान शहरात पोहोचली आहे. दरम्यान, कृषीवलच्या या सामाजिक बांधिलकीबद्दल माथेरानकरांनी कौतुक केले आहे. याप्रकरणी ई-रिक्षा सांभाळण्याची जबाबदारी असलेल्या अधिकार्यांवर कारवाई करण्याची मागणी थेट जिल्हाधिकार्यांकडे केली जाणार आहे.
माथेरान शहरात पर्यावरणपूरक ई-रिक्षा चालवण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर डिसेंबर 2022 मध्ये माथेरान पालिकेने सात ई-रिक्षांची खरेदी केली. महिंद्रा कंपनीच्या या रिक्षांच्या माध्यमातून तीन महिन्यांचा पहिला आणि नंतर दुसर्या पायलट प्रकल्पामध्ये विद्यार्थी आणि प्रवाशांची वाहतूक केली गेली. 10 जूनपासून न्यायायलाने हातरिक्षा चालकांच्या हाती पर्यावरणपूरक ई-रिक्षा देण्याचा निर्णय घेतल्यावर माथेरान पालिकेने खरेदी केलेल्या सात ई-रिक्षा बंद करण्यात आल्या. नंतर त्या सातपैकी पाच ई-रिक्षा या माथेरान पालिकेच्या कम्युनिटी सेंटरमध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्या, तर अन्य दोन ई-रिक्षा या माथेरान पालिकेच्या बी.जे. रुग्णालयाच्या समोर ठेवण्यात आल्या. त्या दोन ई-रिक्षा गेल्या दोन महिन्यांपासून गायब होत्या. त्याबद्दल माथेरान शहरात उलटसुलट चर्चा सुरु होती. त्यावेळी माथेरान पालिकेचे कार्यालयीन अधीक्षक सदानंद इंगळे हे सातत्याने त्या ई-रिक्षा दुरुस्तीसाठी पनवेल येथील महिंद्रा शोरूममध्ये पाठवण्यात आल्या असल्याचे उत्तर देत होते.
याबाबत कृषीवलचे प्रतिनिधींनी शोधपत्रकारिता करीत त्यातील एका ई-रिक्षेचा शोध घेतला. सदर आर 4 या क्रमांकाची रिक्षा नेरळ गावातील मोहचीवाडी भागात प्रवासी वाहतुकीचा व्यवसाय करीत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर सदर बातमी सचित्र स्वरूपात आज 25 डिसेंबर रोजी वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली. त्याआधी काळ 24 डिसेंबर रोजी ही बातमी कृषीवलच्या ऑनलाईन एडिशनमध्ये प्रसिद्ध झाल्यावर माथेरान पालिकेच्या अधिकार्यांची भंबेरी उडाली. आज सकाळी माथेरान शहर जागे होण्याच्या आधी ही ई-रिक्षा माथेरान शहरात हजर झाली, त्यामुळे कृषीवलचा दणका महत्त्वाचा ठरला असून, अनेक महिने दुरुस्तीसाठी पनवेल येथे असलेल्या रिक्षा अगदी सकाळी माथेरानमध्ये कशी पोहोचू शकली, असा प्रश्न असून, त्याबाबत रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडे उद्या रीतसर तक्रार केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.
कृषीवलचे कौतुक
यानिमित्ताने माथेरान शहरातील नागरिकांनीदेखील कृषीवलच्या शोधपत्रकारितेचे कौतुक केले असून, ई-रिक्षा सांभाळण्याची जबाबदारी असलेले कार्यलयीन अधीक्षक सदानंद इंगळे यांनी खरी माहिती जनतेला सांगावी, अशी विचारणा समाज माध्यमांवर केली आहे. त्याचवेळी पालिकेच्या अधिकार्यांनी त्याबाबत सत्य माहिती जनतेला द्यायला हवी, असे आवाहनदेखील केले आहे.