आ. ज्ञानेश्‍वर म्हात्रेंचे मिशन; शिक्षकांना टेन्शन

। अलिबाग । माधवी सावंत ।

शिक्षकांसाठी गेली 8 वर्षे झटणारे, जुन्या पेन्शन योजनेसाठी वारंवार जेलमध्ये गेल्याचे सांगणारे कोकण शिक्षक मतदारसंघाचे आ. ज्ञानेश्‍वर म्हात्रे गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या संपाबाबत एक अवाच्चरही काढत नाहीत. रायगडसह कोकणातील शिक्षक संपात सहभागी असताना कोणताही पाठिंबा दर्शवित नाहीत. यावरुन आ. म्हात्रेंचे जुन्या पेन्शन योजनेबाबतचे मिशन किती खरे होते, याचे टेन्शन शिक्षकांना आले असल्याचे अनेकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर बोलून दाखविले.

निवडणूक तोंडावर येताच अनेक उमेदवार जाहिरनामा प्रसिद्ध करतात. त्याप्रमाणे आ. म्हात्रे यांनी कर्मचार्‍यांची कमकूवत बाजू लक्षात घेता जुन्या पेन्शन योजनेचा मुद्दा जाहिरनाम्यात प्रसिद्ध केला. त्याचप्रमाणे शिक्षकांना खोटी स्वप्न दाखवित भविष्यात शिक्षकांसाठी चांगले काम करण्याचे, शिक्षकांच्या पेन्शनचा प्रश्‍न सोडवणार असल्याचा निर्धार त्यांनी केला होता. मात्र प्रत्यक्षात विजय मिळविल्यानंतर जुन्या पेन्शन योजनेचे मिशन ते सोयीस्कररित्या विसरल्याचा आरोप शिक्षकांनी केला आहे.

राज्यात भाजप-शिंदे गटाची सत्ता असतानाही अनेक शिक्षकांवर संपात सहभागी झाल्याबाबत कारवाईची टांगती तलवार ठेवण्यात आली आहे. निवडणूकी दरम्यान मते मिळविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जुन्या पेन्शन योजनेबाबत सकारात्मक असल्याचे सांगितले होते. तसेच शिक्षक असल्यामुळे अन्य शिक्षकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणार नसल्याचे वारंवार सांगितल्यामुळे म्हात्रे यांचे पारडे जड झाले. मात्र निवडणूकीचा निकाल लागल्यानंतर शिक्षकांचे आ. म्हात्रे कुठे गायब झाले, गेल्या वर्षांपासूनचा त्यांचा लढा संपूष्टात आला का, शिक्षकांसाठी लढणं त्यांनी थांबविलं का, असे अनेक प्रश्‍न शिक्षकांनी उपस्थित केले आहेत.

आ. म्हात्रे यांनी विजयी झाल्यानंतर शिक्षकांच्या समस्या सोडविणे अथवा त्या सरकारसमोर मांडणे अपेक्षित होते. मात्र म्हात्रे यांनी संपात सहभागी झाल्यानंतरही शिक्षकांबाबतची भूमिका कुठेही ठळकपणे मांडली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कोकणातील शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

शिक्षकांसाठी लढणार- बाळाराम पाटील
कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीत पराभव पदरी पडल्यानंतरही आजतागायत पेन्शनसाठी अर्ज केला नाही. जोपर्यंत सरकारी, निमसरकारी कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन योजना लागू होत नाही, तोपर्यंत स्वतःचा देखील अर्ज भरणार नाही. सत्तेत नसलो तरी शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी कायम लढणार.असा निर्धार शेकाप नेते बाळाराम पाटील यांनी केला आहे.

आ. ज्ञानेश्‍वर म्हात्रेंचा जाहिरनामा
राज्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन लागू व्हावी म्हणून गेल्या आठ वर्षांपासून सतत आंदोलन करीत आहे. आंदोलनात अनेकदा अटकही करण्यात आली. कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन योजना मिळावी, म्हणून अहोरात्र मेहनत करुन जोपर्यंत जुनी पेन्शन योजना लागू होत नाही, तोपर्यंत गप्प बसणार नाही. कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन योजना मिळवून देणारच असे आ. म्हात्रे यांनी जाहिरनाम्यात म्हटले होते.

अधिवेशनात गप्प का; शिक्षकांचा सवाल
निवडणूकीत मोठ-मोठी आश्‍वासने देणारे आ. म्हात्रे यांनी संप काळात रस्त्यावर उतरलेल्या शिक्षकांची बाजु अधिवेशनात का मांडली नाही, असा संतप्त सवाल शिक्षकांनी उपस्थित केला आहे. अनेक शिक्षकांनी तर चुकीच्या उमेदवाराला सहकार्य केल्याची भावनाही नाव न सांगण्याच्या अटीवर व्यक्त केली.

Exit mobile version