स्वच्छतेबाबत व्यक्त केली नाराजी; तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश
| कोळा | वार्ताहर |
सांगोला पंचायत समितीमध्ये एका कार्यक्रमाप्रसंगी गेल्यानंतर आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना पंचायत समिती बचत भवन परिसरात घाणीचे साम्राज्य दिसून आले. यावर तात्काळ त्यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेत झाडाझडती घेतली. पंचायत समिती नियोजित कार्यक्रमासाठी आ. डॉ. बाबासाहेब देशमुख गेले होते. आमदारांची गाडी आल्यानंतर त्या ठिकाणी गर्दीचा गराडा पडला. आ. देशमुख सर्वांना भेटत असताना बचत भवनमध्ये स्थानापन्न होण्यासाठी गेले असता यावेळी मात्र सर्वच टेबल खुर्चीवर धुळीचे प्रमाण दिसून आले. संपूर्ण हॉलची पाहणी केली असता तेथे अडगळ दिसून आली. यावेळी त्यांनी तात्काळ प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना व शिपायांना या गोष्टीचा जाब विचारला पंचायत समिती सर्वसामान्यासाठी असून, या इमारतीची निगा राखण्याचे काम पंचायत समिती प्रशासनाचे आहे, असे खडसावून सांगितले. स्वच्छता ठेवा अशी तंबी दिली. आमदारांच्या या रुद्रावतारामुळे प्रशासनाची भंबेरी उडाली. यानंतर आमदार बाबासाहेब देशमुख यांनी संपूर्ण पंचायत समिती ऑफिसच्या प्रत्येक टेबलची पाहणी केली. धुळीचे प्रमाण दिसून आले. जिथे अडगळ अस्वच्छता त्रुटी दाखवून तात्काळ त्याची दुरुस्ती स्वच्छ करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. नंतर पंचायत समितीमध्ये आल्यानंतर अस्वच्छता दिसता कामा नये, असे स्पष्ट शब्दात खडसावून सांगितले. आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या या कृतीमुळे पंचायत समितीमध्ये आलेल्या सर्वसामान्य नागरिकांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.
