। अलिबाग । प्रतिनिधी ।
भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भोईर यांनी बंडखोरी करीत उमेदवारी अर्ज भरल्याने आमदार दळवी यांची डोकेदुखी वाढली आहे. त्यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी शिंदे गटातील आमदार महेंद्र दळवी यांनी वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न सुरु केले आहेत. भाजपच्या एका कार्यकर्त्याला जवळ करून आपली पोळी भाजून घेण्याचा डाव त्यांनी आखल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. परंतु, त्यांचा हा डाव दिलीप भोईर हाणून पाडणार असल्यादेखील बोलले जात आहे.
आमदारकीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिलीप भोईर यांनी गेल्या 23 महिन्यांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. गावे, वाड्यांमध्ये जाऊन त्यांनी पक्ष वाढविण्याचा प्रयत्न केला. भाजपच्या वेगवेगळ्या सभांमध्ये दिलीप भोईर गर्दी जमविण्याचा प्रयत्न केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेदेखील ही गर्दी बघून भारावून गेले होते. त्यामुळे त्यांनीदेखील भाजपचा आमदार असावा, असे स्वप्न भोईरांना दाखविले होते. वरिष्ठ पातळीवर चर्चा करू असे आश्वासनही सभेमध्ये दिले होते. भोईर यांना उमेदवारी मिळेल, अशी आशा होती. परंतु, शिंदे गटातील महेंद्र दळवी यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर भोईर समर्थकांची घोर निराशा झाली. अखेर भोईर यांनी बंडखोरी करीत मंगळवारी 29 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरला. त्यांच्यासोबत भाजपच्या जिल्हा सचिवांसह काही पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. दिलीप भोईर यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दळवी यांची डोकेदुखी वाढली. भोईर यांनी अर्ज भरू नये यासाठी त्यांनी वेगवेगळे प्रयत्न केले होते. परंतु, ते सर्व प्रयत्न असफल ठरले.
सोमवारी उमेदवारी अर्जावरील माघार घेण्याची प्रक्रिया आहे. भोईर यांनी अर्ज मागे घ्यावा, यासाठी दळवी यांनी भाजपच्या काही कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्याविरोधात षड्यंत्र आखण्यासाठी पुढे ढकलले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दळवी यांच्या जाळ्यात भाजपचे कार्यकर्ते चांगलेच सापडले आहेत. त्यामुळे दळवी बोलतील यापद्धतीने त्यांनी दिलीप भोईर यांना नामोहरम करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. आपली पोळी भाजून घेण्यासाठी दळवींनी प्रयत्न सुरू केला असल्याची चर्चा जोर धरत आहे.
60 हजार मतांनी निवडून येणार असल्याचा गाजावाजा करणार्या दळवींच्याविरोधात दिलीप भोईर उभे राहिल्याने दळवींची आमदारकीची वाट बिकट झाली आहे. मागील ग्रामपंचायत निवडणुकीच्या कालावधीत भोईरांनी दळवींवर विश्वास ठेवला होता. परंतु, त्यांनी त्यांचा विश्वासघात केला होता, याचा पुनरुच्चार अनेकदा भोईर यांनी जाहीर सभांमधून केला आहे. त्यामुळे दळवींबद्दल भोईरांच्या मनात तीव्र नाराजी आहे. भोईर यांनी माघार घेण्यासाठी अनेकांनी देव पाण्यात ठेवल्याची चर्चा आहे. भोईरांनी माघार घेतल्याची चर्चादेखील वेगवेगळया ठिकाणी करून भोईर यांच्या समर्थकांमध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे भोईर काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.