| मुंबई | प्रतिनिधी |
आमदार निवासातील कँटीनमध्ये कर्मचाऱ्याला मारहाण केल्यामुळे वादात सापडल्यानंतर आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा एकदा नवा वाद ओढवून घेतला आहे. शिवाजी कोण होता? या दिवगंत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना अश्लील शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी संजय गायकवाड यांनी दिल्याचा आरोप केला जात आहे.
1988 मध्ये लिहलेल्या शिवाजी कोण होता? या पुस्तकाचा आमदार गायकवाड यांना अचानक साक्षात्कार झाला आहे. त्यांनी प्रकाशकाला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करुन धमकी दिल्याने सर्वच स्तरातून तीव्र प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत. गायकवाड यांनी प्रशांत आंबी यांना फोन करुन अश्लील शिवीगाळ केली, याचा कथित ऑडीओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करणारा गोविंद पानसरे कोण? असे म्हणत गायकवाड आंबी यांना घरात घुसून मारीन, चिरडून टाकण्याची आणि जीभ कापून टाकण्याची धमकी या ऑडीत देत आहेत. तसेच, पानसरेंचे काय झाले? माहिती आहे ना? असाही इशारा दिला. गायकवाड आणि आंबी यांचा समोर आलेल्या कथित ऑडीओत त्यांना अत्यंत अश्लील शिवीगाळ केल्याचे समोर आले आहे. गायकवाड आंबी यांनी तू ब्राम्हण आहेस का? असे विचारत असल्याचे देखील या ऑडीओतून समोर आले आहे. त्यामुळे आमदार गायकवाड यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासह त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे.
आ. गायकवाड यांची प्रकाशकाला धमकी
