आंबेवाले मारुती मास्तर गेले- आ. जयंत पाटील

आ. जयंत पाटील, सरचिटणीस, शेकाप

आमचे आंबेवाले मारुती मास्तर गेले. ज्यांच्या आशीर्वादावाचा आणि सदिच्छेचा हात आपल्या मागे आहे, या कल्पनेने कार्यकर्त्यांना कित्येक पटीने बळ मिळेल, अशा ज्येष्ठ नेत्यांमध्ये मारुती मास्तर एक होते. मात्र, असे असले तरीही, त्यांचे व्यक्तिमत्त्व आगळेवेगळे होेते. अलिबाग तालुक्यात खारेपाटातील एका प्रतिष्ठित पाटील कुटुंबात मारुती मास्तरांचा जन्म झाला. त्यांनी आपल्या आयुष्याची सुरुवात शिक्षक म्हणून सुरु केली. त्यांची आणि माझी तोंडओळख 1974 साली जिल्हा परिषदेतील स्व. प्रभाकर पाटील यांच्या पोटनिवडणुकीत झाली. जी निवडणूक संपूर्ण राज्यात गाजली होती. बॅ. अंतुले त्यावेळी मंत्री होते. त्यांच्या विरोधात शहाबाज, कमळपाडा येथील दुसरे प्रभाकर पाटील उभे होते.

जिल्हा परिषदेच्या छोट्या मतदारसंघात त्यावेळी 500 एसआरपी, 100 पोलीस गावोगावी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते. त्यावेळी अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. अशा परिस्थितीत कामार्ले विभागाची जबाबदारी मारुती मास्तरांवर होती. गोरे-गोमटे, सदैव हसतमुख, संयमी व शांत स्वभावाच्या मास्तरांना मी त्यावेळी पहिल्यांदा बघितले. निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी कामार्ले ग्रामपंचायतीममधील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रात्री दोन वाजता हल्ला केला. या पार्श्‍वभूमीवर विजूशेठ आम्रे यांच्या नेतृत्वाखाली जे प्रमुख कार्यकर्ते होते, त्यांना अटक करण्यात आली. जवळपास सर्वच शेकाप कार्यकर्त्यांना अटक झाल्यानंतर निवडणूक प्रक्रियेसह न्यायालयीन कामकाजाची संपूर्ण जबाबदारी तितक्याच ताकदीने मास्तरांनी सांभाळल्याचे मी जवळून पाहिले.

पक्षाशी एकनिष्ठ असणार्या मास्तरांनी वेळप्रसंगी खिशातले पैसे खर्च करुन जिद्दीने काम केले. त्यानंतर काही वर्षांनी ते राजकारणापासून दूर गेले. मात्र, त्यांच्यातील उद्योगी प्रवृत्ती कायम होती. राजकारणातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी हाशिवरे येथील मोकळ्या जागेत आंब्यांची लागवड केली. आज कोट्यवधी रुपयांची उलाढाल करणारे हे कर्तबगार कुटुंब म्हणून ओळखले जात आहे. सुरुवातीला मुंबईच्या आंबा बाजारात देवगडचा आंबा पहिला दाखल होत असे. मात्र, मास्तरांनी देवगडच्या आंब्याची मक्तेदारी मोडीत काढली. त्यांनी हाशिवरे येथील आंब्याचा ब्रँड नावारुपास आणला. त्यानंतर वर्तक गुरुजी यांनीदेखील आंबा उत्पादनात महत्त्वपूर्ण कामगिरी केली.

विशेष म्हणजे, मास्तरांनी हंगामापूर्वी, म्हणजेच दोन महिने अगोदरच हाशिवर्‍याचा आंबा बाजारात नेण्याची उल्लेखनीय कामगिरी केली. म्हणूनच आज हाशिवर्‍याचे नाव केवळ मुंबई बाजारातच नव्हे; तर संपूर्ण जगभरात गेले आहे. त्यांनी घेतलेले कष्ट, जिद्द यामुळेच दर्जेदार आंबा हाशिवरे येथे तयार झाला. त्यांच्या आंब्याचा दर्जा पाहून हजारो शेतकर्‍यानी त्यांचे मार्गदर्शन घेतले. यासाठी कोणतेही पैसे न आकारात त्यांनी स्वतः शेतकर्‍याना उत्पादनाबाबत माहिती दिली. त्यांनी घेतलेल्या कष्टामुळे आज जगभरात आंबा पाठविणारे व्यापारी स्वतः त्यांच्या बागेतील आंबा विकत घेण्यासाठी त्यांच्या घरी येत आहेत. ही त्यांच्या कामाची पोचपावती आहे.

व्यवसाय करीत असतानाच मास्तरांनी त्यांच्या मुलांना योग्य शिक्षण दिले. त्यांची सर्व मुले, नातू उच्चशिक्षित आहेत. त्यांनी घरात डॉक्टर, इंजिनिअर घडविले. एक प्रतिष्ठितकुटुंब म्हणून आमच्या खारेपाटात त्यांनी नाव कमाविले. माझे त्यांच्यासोबत व्यक्तिगत संबंध चांगले राहिले. कामात कधीही चूक झाली तर त्यांनी हक्काने चूक दाखवून दिली. तर, समाजकारण तसेच राजकारणात चांगली कामगिरी करताना अनेकदा कौतुकाची थापही दिली. त्यांनी आदर्श व सुंसस्कृत असे घराणे घडविले. नुसती मुलं शिकवली नाही, तर शेतीबद्दल आत्मीयताही त्यांच्यात अंगीकारली.

नाविन्यपूर्ण आणि शिक्षणाचा परिपूर्ण उपयोग कसा करावा, हे त्यांनी मुलांना शिकवलं. काय योगायोग पाहा, तीन-चार महिन्यांपूर्वी माझ्या स्वप्नात ते आले. त्यांनतर दुसर्‍याच दिवशी त्यांना भेटण्यासाठी मी व माझे सहकारी अनिल पाटील त्यांना भेटलो. दहा-पंधरा मिनिटांची भेट घेण्याचे ठरले. मात्र, ती भेट दोन तास कशी झाली, समजलंच नाही. त्या भेटीत अनेक विषयांवर चर्चा केली. जुन्या आठवणींना उजाळा दिला. माझ्या कामकाजांबद्दल त्यांनी कौतुक केले. ‘असेच काम कर’, असं जिव्हाळ्याने सांगितले. त्यावेळी त्यांची तब्येत उत्तम होती. त्याप्रसंगी अजून खूप काही करण्यासारखे आहे, असे मी त्यांना सांगितले. त्यावेळी त्यांनी ‘जयंता, आता बस्स झाले, भरपूर केले, मी आनंदी आहे’, असे सांगितले. त्यावेळी त्यांच्या चेहर्‍यावर तेज होते.

खरं सांगायचं तर, खारेपाटातील आंबा व्यवसाय वाढविण्याचं आणि त्याचा दर्जा कायम ठेवण्याचे काम त्यांनी सातत्याने केले. पुढच्या पिढीलाही आदर्शवत ठरेल, अशी कामगिरी त्यांनी केली. त्यांच्या मुलांनी डॉक्टर, इंजिनिअरिंग असे उच्चशिक्षण घेऊनही ते वडिलांचा आंबा व्यवसाय करीत आहेत. त्याला आधुनिकतेचीही जोड देत आहेत. त्यांनी जो आदर्श नव्या पिढीसमोर ठेवला आहे, त्याचा मला सार्थ अभिमान आहे. पाटील बंधूंबरोबर अनेक चळवळीत, निवडणुकांमध्ये जिद्दीने, खांद्याला खांदा लावून लढणारा हा लढवय्या शेतकरी होता. त्याला खारेपाटातील शेतकरी चळवळ कधीही विसरू शकणार नाही. नवीन पिढीच्या डोळ्यासमोर स्फूर्ती व आदर्श ठेवून पुढील वाटचाल करणारे त्यांचे जीवन प्रेरणादायक ठरेल. हाशिवर्‍याचा आंबा बाजारात दर्जेदार आंबा म्हणून जोपर्यंत जात राहील, तोपर्यंत मास्तरांचे नाव हे शेवटपर्यंत कायम राहील.

मारुती मास्तरांचा जन्म 14 फेब्रुवारी 1938 रोजी हाशिवरे येथे अत्यंत गरिब परिस्थितीत झाला. त्या काळात त्यांनी जुनी मॅट्रिक ते तेरावीपर्यंतचे शिक्षण घेतले होते. शिक्षक म्हणून त्यांनी 5 वर्षे नोकरी केली. तद्नंतर भाताचा तसेच लाकडाचा व्यापार केला. 1970 साली त्यांनी आंब्याच्या व्यवसायात प्रवेश करुन हाशिवर्याच्या आंब्याचे नाव जगभरात केले. इतकेच नाही तर, त्यांनी बागायत करताना आधुनिक व पारंपारिक पद्धतीचा अवलंब करून सुधारित पद्धतीने शेती केली. आंब्यामध्ये विविध प्रयोग करून नवनवीन शोध लावले.

दरवर्षी बाजारामध्ये प्रथम आंबा पाठविण्याचा विक्रम त्यांनी कायम केला. त्यामुळे त्यांची यशस्वी आंबा उत्पादक म्हणून ख्याती झाली. जवळजवळ 200-250 एकरावर आंबा बागायत तयार करण्यात त्यांनी यश मिळविले. त्यांच्या कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने त्यांना ‘उत्कृष्ट आंबा बागायतदार’ म्हणून पुरस्कार देवून सन्मानित केले.जिल्हा परिषदेनेही त्यांनी ‘शेतीनिष्ठ पुरस्कार’ व ‘रायगड भुषण’ पुरस्कार देवून सन्मानित केले. त्याच्या पश्‍चात त्यांची पत्नी, 4 मुले, 3 मुली, नातवंड व पतवंड असा परिवार त्यांना लाभला.

Exit mobile version