तरुणांनो, आपला टाईम आलाय! अन्यायाविरोधात एकजुटीने लढण्याचे आ. रोहित पवार यांचे आवाहन

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

युवकांनी आता ‘अपना टाईम आयेगा’ असे म्हणण्याची गरज नाही. आपला टाईम आलाय असे समजून अन्यायाविरोधात रस्त्यावर उतरून लढण्याची वेळ आली आहे. दिल्लीतील सत्ताधाऱ्यांना जर कुणी झुकवले असेल, तर ते युवकांच्या एकजुटीने आणि संघर्षाच्या ताकदीने. त्यामुळे शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि महिलांवरील अन्यायाविरोधात सर्व पुरोगामी संघटनांनी एकत्र येऊन लढा अधिक तीव्र केला पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केले.

पुढे ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य कसे असते, हे जगाला दाखवून दिले. महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिवरायांची समाधी शोधून त्यांच्या कार्याचा गौरव केला, तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहातून वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष उभारला. या महान विचारांचा वारसा लाभलेल्या रायगडच्या भूमीवर अन्यायाविरोधात लढण्याची जबाबदारी प्रत्येक कार्यकर्त्याची आहे.

शेतकरी कामगार पक्षाच्या संघर्षशील परंपरेचे कौतुक करत त्यांनी सांगितले, भाई जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेकापने शेतकरी, कामगार, युवक आणि महिलांच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष केला आहे. ही परंपरा भविष्यातही अधिक जोमाने पुढे जाईल, असा मला विश्वास आहे.

देशातील अलीकडील विद्यार्थी आंदोलनाचा उल्लेख करत आ. पवार म्हणाले, काही दिवसांपूर्वी देशभरातील युवकांनी अन्यायाविरोधात उभारलेल्या संघर्षाने सत्तेच्या अहंकारालाच झुकवले. युवकांची एकजूट ही कोणत्याही सत्तेपेक्षा मोठी ताकद असल्याचे त्या आंदोलनाने सिद्ध करून दाखवले. निवडणुकांमधील पैशाच्या वाढत्या प्रभावावर टीका करत ते म्हणाले, मतांसाठी हजार-दोन हजार रुपये वाटून लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, पैशाने निवडून आलेले लोकप्रतिनिधी सर्वसामान्यांकडे पुन्हा वळून पाहात नाहीत. त्यामुळे युवक, विद्यार्थी, शेतकरी आणि महिला यांनी जागृत होऊन संघटितपणे परिवर्तनासाठी पुढे आले पाहिजे.

शेकापच्या इतिहासाचा गौरव करत त्यांनी सांगितले, 15 ऑगस्ट 1947 रोजी देशाला स्वातंत्र्य मिळाले, त्याच्या 13 दिवस आधी, म्हणजे 2 ऑगस्ट रोजी शेतकरी कामगार पक्षाची स्थापना झाली. स्वातंत्र्यलढ्यात आणि सर्वसामान्यांच्या न्यायाच्या लढ्यात शेकापच्या नेत्यांनी दिलेले योगदान मोठे आहे. पवार कुटुंबाचे शेकापशी असलेले जुने संबंध अधोरेखित करत रोहित पवार म्हणाले, माझे पणजोबा आणि पणजी शेकापच्या विचारांशी जोडलेले होते. काटेवाडी येथे शेकापचे अनेक दिग्गज नेते येत असत. त्या विचारांचा प्रभाव आमच्या कुटुंबावर आजही कायम आहे. त्यामुळे शेकापशी आमचे नाते हे केवळ राजकीय नाही, तर वैचारिक आणि भावनिक आहे.

Exit mobile version