पहिल्या क्रमांकावर बसपा उमेदवाराचा ताबा
| महाड | प्रतिनिधी |
महाड माणगाव पोलादपूर विधानसभा मतदारसंघामध्ये आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये आठपैकी पाच उमेदवार शिल्लक राहिले आहेत. या पाच उमेदवारांमध्ये वर्णमालेनुसार बहुजन समाज पार्टीचा उमेदवाराचे नाव मतदान यंत्रामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. याचा धसका उमेदवार गोगावलेंनी घेतला आहे. या बटणाचा तोटा होईल, त्यामुळे आपले नाव पहिल्या क्रमांकावर असावे यासाठी गोगावलेंनी मेहनत घेतली, परंतु त्याला यश आले नाही, त्यामुळे त्यांनी मोठा धसका घेतल्याची जोरदार चर्चा मतदारसंघात सुरू आहे.
महाड माणगाव पोलादपूर विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी या दोन युतीमधील उमेदवारांमध्ये लढत असल्याचे स्पष्ट झाले आहे. महाडमध्ये महाराष्ट्रात सगळ्यात कमी उमेदवार संख्या आहे. आठपैकी आता केवळ पाच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामुळे महायुती आणि महाविकास आघाडी यामध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे.
यामध्ये शिवसेनेचे भरत मारुती गोगावले, उबाठाच्या स्नेहल माणिक जगताप, बहुजन समाज पार्टीच्या अमृता अरुण वाघमारे, वंचित बहुजन आघाडीचे अनंदराज रवींद्र घाडगे, अपक्ष प्रज्ञा लक्ष्मण खांबे यांचा समावेश आहे. उमेदवार जरी पाच असले, तरी खरी लढत ही शिवसेनेचे भरत गोगावले व उबाठाच्या स्नेहल जगताप यांच्यात होणार आहे. गोगावले हे तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले असून, ही त्यांची चौथी वेळ आहे. मात्र, भरत गोगावले यांनी मतदान यंत्रावर आपले नाव पहिल्या क्रमांकावर असावे यासाठी खूप मेहनत घेतली. मात्र, त्यामध्ये त्यांना यश आले नाही. परिणामी, वर्णमालेनुसार अमृता वाघमारे यांचे नाव मतदान यंत्राच्या पहिल्या क्रमांकावर आले आहे. यामुळे भोगावले यांचे नाव दुसर्या क्रमांकावर गेले आहे. तर स्नेहल माणिक जगताप यांचे नाव तिसर्या क्रमांकावर गेले आहे.
प्रचार करताना नेहमीच मतदान यंत्राच्या पहिल्या बटणावर नाव येण्यासाठी उमेदवारांचा मोठा कल असतो. महाड मतदारसंघात वर्णमालेनुसार पहिल्या क्रमांकावर अमृता वाघमारे यांचे नाव आल्याने भरत गोगावले यांनी चांगला धक्का घेतला आहे. याबाबत सर्वत्र चर्चांना उधाण आले आहे.