मविआची यादी रद्द; शिंदेंचा ठाकरे गटाला दणका
। मुंबई । प्रतिनिधी ।
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र पाठवून विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त आमदारांची महाविकास आघाडीने पाठवलेली यादी मागे घेण्याची विनंती केली होती. विशेष म्हणजे राज्यपालांनी ही मागणी मान्य करुन ती यादी मागे घेतल्याचं वृत्त समोर आले आहे. त्यामुळे हा ठाकरे गट आणि महाविकास आघाडीतील सदस्य पक्षांसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना महाविकास आघाडीकडून पाठविण्यात आलेली राज्यपाल नियुक्त सदस्यांची यादी मागे घेण्यासाठी पत्र लिहिले होते. महाविकास आघाडीने राज्यपाल कोश्यारींना 20 नावे पाठवली होती. हीच यादी मागे घेण्यात यावी, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना केली. राज्यपालांनी या मागणीनुसार ही यादी मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता शिंदे गट आणि भाजपाकडून राज्यपालांना नवी यादी दिली जाणार आहे. म्हणजेच विधानपरिषदेमधील राज्यपाल नियुक्त 12 आमदार कोण असतील, हे आता शिंदे गट आणि भाजपा ठरवणार आहे.
शिंदे सरकारकडून लवकरच राज्यपालांना नवी यादी दिली जाणार आहे. मुख्यमंत्री शिंदेंनी पाठवलेलं पत्र आणि त्यानुसार घेण्यात आलेला यादी मागे घेण्याचा निर्णय हा शिंदेंनी ठाकरेंना दिलेला आणखीन एक धक्का आहे. यापूर्वी महाविकास आघाडी सरकारने अडीच वर्षांच्या कालावधीमध्ये दोनदा राज्यपालांकडे यादी दिली होती. मात्र राज्यपाल कोश्यारींनी यासंदर्भात कोणताही निर्णय घेतला नव्हता. राज्यपालांनी ही यादी मान्य केली नव्हती. तांत्रिक बाबी किंवा कायदेशीर बाबी दाखवत राज्यपालांनी यादी स्वीकारण्यास नकार दिला होता.
विधानपरिषदेच्या 12 आमदारांच्या नावांची यादी दीड वर्षापूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींकडे महाविकास आघाडीने सादर केली होती. मात्र, यावर अद्याप निर्णय झालेला नसून ही यादी फेटाळली नाही. याचाच अर्थ ही यादी अजुनही विचाराधीन आहे. जर आधीची यादी रद्द केली तर त्याविरोधात न्यायालयात दाद मागू.
विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेते
दिग्गज नेत्यांचा समावेश
महाविकासआघाडी सरकारने सत्तेत असताना शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या प्रत्येकी 4 जणांची नावं राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवली होती. राजू शेट्टी, एकनाथ खडसे, रजनी पाटील, सचिन सावंत, ऊर्मिला मातोंडकर यांच्यासह दिग्गज नेत्यांचा या यादीत समावेश होता. दरम्यान, शिंदे सरकारमधील नव्या यादीसाठी नेत्यांमध्ये चढाओढ होताना दिसत आहे. या जागांसाठी शिंदे गटातील विजय शिवतारे, रामदास कदम यांच्या नावांचा यादीत समावेश असण्याची शक्यता आहे. याशिवाय भाजपाकडून पंकजा मुंडे, हर्षवर्धन पाटील, चित्रा वाघ यांच्या नावांची चर्चा आहे.