गणेशमूर्ती निर्मितीला व्यवसायाचा दर्जा मिळवून देणार- आ.जयंत पाटील

| हमरापूर। प्रतिनिधी ।

पेण शहर व तालुका हे विघ्नहर्त्या गणपती बाप्पाचे माहेर व पंढरी म्हणून ओळखली जाते. त्यामुळे गणेशमुर्ती निर्मितीला व्यवसायाचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन शेतकरी कामगार पक्षाचे आ. जयंत पाटील यांनी पेण तालुक्यांतील हमरापूर येथे केले.

आ. जयंत पाटील यांची रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी फेर निवड करण्यात आली आहे. त्यामुळे  श्री गणेश मुर्तिकार संघटनेच्यावतीने आ.जयंत पाटील यांचा भव्य सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास आ. जयंत पाटील, सुप्रिया पाटील, गणेश मुर्तिकार संघटनेचे अध्यक्ष अभय म्हात्रे, महाराष्ट्र राज्य उत्सव समितीचे अध्यक्ष हितेश जाधव, सचिव बावधनकर, माजी जि.प. सदस्य महादेव दिवेकर, मुर्तिकार सुभाष दाभाडे, सरपंच राकेश दाभाडे, हमरापूर विभाग श्री गणेश मुर्तिकार संघटनेचे अध्यक्ष किरण दाभाडे, माजी अध्यक्ष कृणाल पाटील, अशोक मोकल, सुयोग मोकल, आर.के. पाटील सर, कळवे ग्रामपंचायतीचे सरपंच सतिश पाटील, किरण मांगरुळकर, संदेश कदम, विनोद नाईक, सचिन शेलार आदींसह मुर्तिकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना आ. जयंत  पाटील म्हणाले की, सभागृहात  अभ्यासपूर्ण लक्षवेधी मांडली तर काय होते हे आपण दाखवून दिले.  एक  लाख 76 हजार कामगार मूर्ती बनविण्याचे काम करत आहेत. हमरापूर विभागातील तरुणांनी नवीन व्यवसाय निर्माण करुन उदरनिर्वाह करायचा हे दाखवून दिले आहे. मी काही उपकार केले नाहीत, आमदार म्हणून काम केले असे सांगून  सरकारने जर लक्ष दिले नाही तर महामार्गावर आंदोलन करावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला. 

कायदे कसे करावे हे आम्हाला सांगण्याची गरज नाही, तो आमचा अधिकार आहे. जनतेच्या हितासाठी कायदे बनवावे लागतात, घटनेत तरतूद आहे. आपली मागणी मान्य केल्याबद्दल पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पण धन्यवाद दिले.  मी शब्द दिला की पाळतो, मागे हटत नाही. बहुजन समाजाचे संरक्षण करणे हे माझे काम आहे. एमआयडीसी जसे जागा सवलतीने देते तसे मूर्ती व्यवसायासाठी सवलतीने जागा मिळावी. यासाठी प्रयत्न करायला हवे. हा व्यवसाय वाढावा यासाठी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कर्ज देईल. त्यासाठी  बैठक आयोजित करु असे सांगून उद्योजाचा दर्जा दिल्यानंतर सबसिडी मिळेल. गणेशमूर्ती निर्मितीला व्यवसायाचा दर्जा द्यायला हवा. त्यासाठी मुख्यमंत्र्यासोबत बैठक आयोजित केली जाईल असे पाटील यांनी स्पष्ट केले. 

नवीन पीढी तयार केल्यावर कधी टाटा करते हे कळत नाही, असा टोला त्यांनी धैर्यशील पाटील यांचे नाव न घेता लगावला. तरुणींना बचत गटाच्या माध्यमातून सहाय्य देता येतील. त्यासाठी बचत गट तयार करा.  परदेशातील नागरिकांसाठी गणेशमूर्ती पोहचविण्यासाठी  प्रयत्न करा. हमरापूरचे गणपती ही ओळख तयार झाली आहे. गणेशमूर्तीकारांना सर्वोतोपरी सहकार्य करणार असून यामध्ये कोणतेही राजकारण करणार नाही, असे शेवटी त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकात बावधनकर यांनी प्लास्टरवर आणलेली बंदी, त्यानंतर संघटनेने केलेले कार्य व आ. जयंत पाटील यांनी केलेली मदत याबद्दल आभार मानले. तर हितेश जाधव यांनी प्लास्टरवर बंदीचा निर्णयानंतर लढा सुरु ठेवला होता. त्यासाठी आम्ही आ. जयंत पाटील यांची भेट घेतली. त्यांनी प्लास्टरवर बंदी आणता येणार नाही असे सांगून विधानसभेत शासनाचे लक्ष वेधले त्याबद्दल त्यांनी संघटनेच्या वतीने त्यांचे आभार मानले व पुढेही सहकार्य करावे असे सांगितले. यावेळी अशोक मोकल व इतरांनीही आपले विचार मांडले.

Exit mobile version