| महाड | प्रतिनिधी |
महाड शहरातील व्यापारी आस्थापना आणि व्यावसायिकांनी मराठी भाषेतील फलक (पाट्या) शासनाच्या नियमानुसार मोठ्या आणि स्पष्ट अक्षरांत लावाव्यात, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) पुन्हा आक्रमक झाली आहे. या संदर्भात मनसेचे महाड शहराध्यक्ष पंकज उमासरे यांनी महाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना लेखी निवेदन देत, एक महिन्याच्या आत सर्व पाट्या नियमानुसार मराठीत लावाव्यात, अशी मागणी केली. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि राज्य शासनाच्या नियमानुसार सर्व व्यावसायिक आस्थापनांवर मराठी भाषेतील फलक मोठ्या अक्षरांत असणे बंधनकारक आहे. मात्र, महाड शहरात अनेक ठिकाणी या नियमाचे उल्लंघन होत असल्याचे मनसेने निदर्शनास आणून दिले. मनसेने प्रशासनाला स्पष्ट इशारा देत सांगितले की, एक महिन्याच्या आत नियमांची अंमलबजावणी झाली नाही, तर मनसे आपल्या पारंपरिक आंदोलनाच्या शैलीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या फलकांना काळे फासण्याचे आंदोलन करेल. त्यामुळे प्रशासनाने तातडीने कारवाई करून संबंधित व्यावसायिकांना नोटिसा बजावाव्यात, अशी मागणी करण्यात आली. यावेळी महाड तालुकाध्यक्ष मंगेश शिंदे, अमोल दळवी, पंकज उमासरे, अथर्व देशमुख, शंतनु पिसाट, रस्ते शेखर सावंत, प्रदीप पिसाट यांच्यासह मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते.







