उरण पंचायत समिती समोर मनसेचं गेटबंद आंदोलन

उरण | वार्ताहर |
बांधपाडा ग्रुप ग्रामपंचायत खोपटे गावातील राष्ट्रीय पेयजल योजने अंतर्गत पिण्याच्या पाईपलाईनच्या कामांत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाला असून याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही अधिकारी वर्ग ठेकेदाराला पाठीशी घालण्याचे काम करीत आहेत. गेले 7 वर्षांपासून सुरू असलेले पाईपलाईनचे काम आजतागायत अपूर्ण अवस्थेत आहे. त्याविरोधात स्वातंत्र्य दिनी म्हणजे 15 ऑगस्ट रोजी उरण पंचायत समिती समोर गेटबंद आंदोलन करण्याचा इशारा मनसेचे तालुका उपाध्यक्ष सत्यवान भगत यांनी दिला आहे.

बांधपाडा खोपटे ग्रामपंचायतसाठी राष्ट्रीय पेयजल योजने अंतर्गत सन 2015-16 या आर्थिक नवीन पाईपलाईन मंजूर झाली होती. मात्र सदरचे पाईपलाईनचे काम आजतागायत पूर्णत्वास गेलेले नाही. यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाला असल्याचे ग्रामस्थांत बोलले जात आहे. यामुळे ग्रामस्थांना नाईलाजाने टँकरने पाणीपुरवठा करावा लागून पाईपलाईन पासून वंचित राहावे लागत आहे. याबाबत माहितीच्या अधिकारात माहिती मागितल्या नंतर ठेकेदाराने अनेकवेळा लाईन पूर्ण करण्यासाठी बाँड पेपरवर उरण गटविकास अधिकारी यांच्यासमक्ष ग्रामपंचायतीला अनेकवेळा लिहून ही दिले आहे. तरीही आजतागायत काम अपूर्णच आहे.

आजतागायत पाईपलाईनचे काम झाले नसल्याने संबंधित ठेकेदार व अधिकारी वर्ग यांच्यावर शासकीय आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी तातडीने गुन्हा दाखल करावा अन्यथा खोपटा ग्रामस्थ व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून स्वातंत्र्य दिनी म्हणजे 15 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजल्यापासून उरण पंचायत समितीसमोर गेट बंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसेचे उरण तालुका उपाध्यक्ष सत्यवान भगत यांनी उरण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांना दिलेल्या लेखी पत्रात नमूद केले आहे. सदरची प्रत पोलीस ठाण्यात दिली आहे.

Exit mobile version