। पनवेल । प्रतिनिधी ।
कामोठे परिसरात छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या अमली पदार्थ विक्रीचा भांडाफोड करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला व युवक कार्यकर्त्यांनी एका महिलेचा सापळा रचून रंगेहात पकडले. मानसरोवर रेल्वे स्थानकाबाहेर घडलेल्या या कारवाईत संबंधित महिलेला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, तिच्याकडून 64 पुड्यांमध्ये अमली पदार्थासदृष्य साहित्य जप्त करण्यात आले आहे.
कामोठे परिसरात अमली पदार्थ विक्री वाढत असल्याच्या तक्रारी मनसेचे पनवेल शहराध्यक्ष योगेश चिले यांच्याकडे प्रवाशांकडून प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी योजना आखत मानसरोवर स्थानक परिसरात सापळा लावला. बनावट ग्राहक पाठवून संबंधित महिलेकडून अमली पदार्थ खरेदीचा प्रयत्न करण्यात आला. या व्यवहाराचे चित्रीकरणही करण्यात आले.
अमली पदार्थ विक्री होत असल्याची खात्री झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी तात्काळ महिलेला पकडले. यावेळी घाबरलेल्या महिलेने तिच्या हातातील पिशवी फेकून देण्याचा प्रयत्न केला; मात्र कार्यकर्त्यांनी मोबाईलच्या ट्रॉर्चच्या प्रकाशात ती पिशवी शोधून काढली. त्यानंतर महिलेला आणि जप्त साहित्याला कामोठे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
कामोठे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलम बिडवे यांनी सांगितले की, महिलेकडून मिळालेल्या 64 पुड्यांमधील साहित्य तपासणीसाठी फॉरेन्सिक विभागाकडे पाठविण्यात आले आहे. ही महिला नेरूळ येथून येऊन मानसरोवर स्थानकाबाहेर वस्तू विक्रीच्या आडून अमली पदार्थ विक्री करत असल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे.
महापालिकेच्या महासभेत तीव्र संतापानंतरही अनधिकृत फेरीवाले कायम…
दरम्यान, तीन दिवसांपूर्वीच पनवेल महापालिकेच्या महासभेत रेल्वेमार्गाने बाहेरून येणाऱ्या अनधिकृत फेरीवाल्यांबाबत सभागृह नेते प्रकाश बिनेदार यांनी प्रश्न उपस्थित करून सभागृहाचे लक्ष्य वेधले होते. त्या पार्श्वभूमीवर ही घटना रविवारी समोर आल्याने अतिक्रमण नियंत्रण विभागाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शहरात सुरू असलेल्या अशा अवैध व्यवसायांवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी सभागृहातील सत्ताधारी आणि विरोधी बाकांवरील सदस्यांनी आयुक्तांकडे केली होती. मात्र अजूनही तीन दिवस उलटले तरी पनवेलमध्ये अवैध फेरीवाले, वस्तू विक्रेते यांच्यावर कठोर कारवाई होताना दिसत नाही.
