मनसे नेते शेखर सावंत यांनी घेतली आ. जयंत पाटील यांची भेट

। आंबेत । वार्ताहर ।
सध्या सर्वत्र नगरपंचायत रणधुमाळी सुरू असून, अनेक पक्षश्रेष्ठी नेतेमंडळी हे आपल्या मतदार संघात कार्यकर्त्यांची धावती भेट घेऊन तेथील आढावा घेताना दिसत आहेत. म्हसळा नगरपंचायतीवरदेखील यंदाच्या निवडणुकीत अनेक पक्षीय आपली बाजी मारण्याच्या तयारीत असून, शेकापदेखील यंदा कोणासोबत युती करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे अनेक पक्षीय कार्यकर्ते, नाराज नेतेमंडळी नुकत्याच म्हसळ्यात पार पडलेल्या शेतकरी कामगार पक्षाच्या मेळाव्याप्रसंगी उपस्थित होते. यावेळी मनसे नेते शेखर सावंत यांनी आ. जयंत पाटील यांची भेट घेतली. यामुळे राजकीय वर्तुळांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. म्हसळ्यात नव्याने करण्यात आलेली मनसे कार्यकारिणी यामुळे मनसे नेते शेखर सावंत हे नाराज होते. सावंत यांनी गेली चार ते पाच वर्षे मनसे संपर्क अध्यक्ष ही धुरा सांभाळून मनसेला म्हसळा श्रीवर्धन मतदारसंघात आपली पकड मजबूत केली होती. मात्र, नव्याने करण्यात आलेल्या नियुक्तीनंतर सावंत हे नाराज असल्याने त्यांनी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांची मार्गदर्शन मेळाव्यात भेट घेतली. यामुळे सावंत आता कोणता निर्णय घेतील, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Exit mobile version