सदोष मतदार याद्या दुरुस्त करा: शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांची मागणी
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यासह महाराष्ट्रात सदोष व दुबार नावांच्या मतदार याद्या असल्याचा दावा करीत महाविकास आघाडीच्यावतीने निवडणूक आयोगाविरोधात वज्रमूठ आवळली आहे. दरम्यान, मंगळवारी (दि.14) मुख्य निवडणूक अधिकारी यांची भेट महाविकास आघाडीने घेतली. दरम्यान, मतदारयादी सदोष व बनावट दुबार नावे असल्याचे पुरावेदेखील दाखविण्यात आले. मतदारयादी निर्दोष होऊन दुरुस्त होत नाही, तोपर्यंत निवडणुका घेऊ नका, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेते मंडळींनी केली.
यावेळी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे, मनसेचे नेते राज ठाकरे, शेकाप सरचिटणीस जयंत पाटील, माजी आ. बाळाराम पाटील, संजय राऊत, अनिल देसाई, आदित्य ठाकरे, अनिल परब, जयंत पाटील, शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड, बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड, शेकापचे राज्य कार्यालयीन चिटणीस ॲड. राजेंद्र कोरडे, प्रकाश रेड्डी, डॉ. अजित नवले, शैलेंद्र कांबळे, बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई आदींसह राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रसे, शेकाप, मनसे, सीपी कम्युनिस्ट, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.
मुंंबई येथील मंत्रालयात जाऊन महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली. सदोष मतदार याद्यांचा पाढाच वाचून दाखविण्यात आला. बाहेरील मतदारांची नावे मतदार यादीत दुबार असून, बनावट यादी तयार करण्यात आली आहे. सदोष मतदार याद्यांमुळे गैरप्रकार चालत असल्याची माहिती महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिली. पनवेल तालुक्यामध्ये दुबार नावे असलेली नावे अनेक आहेत. दुबार मतदार याद्यांचा पाढाच शेकापचे नेते माजी आ. बाळाराम पाटील यांनी निवडणूक अधिकारी यांच्यासमोर वाचून दाखविला. आता लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. निवडणूक विभागामार्फत हालचाली सुरु झाल्या आहेत. निवडणूकांपूर्वी विशेष मोहीम राबवून मतदारयाद्यांचे शुद्धीकरण करण्याबरोबरच त्या निर्दोष करण्यात याव्यात, अशी मागणी महाविकास आघाडीच्यावतीने निवडणूक अधिकारी यांच्याकडे करण्यात आली. तोपर्यंत निवडणुका घेऊ नका, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. संबंधित प्रस्ताव भारत निवडणूक आयोगाला पाठविण्यात येईल, असे आश्वासन राज्याच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी दिले.
आज होणार बैठक
मुख्य निवडणूक अधिकारी, निवडणूक आयुक्त आदी अधिकाऱ्यांसमवेत बुधवारी (दि.15) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास मुंबईत बैठक घेण्यात येणार आहे. महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसोबत ही बैठक होणार आहे. या बैठकीत दुबार व सदोष मतदार याद्यांबाबत चर्चा केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
मतदारयांद्याच्या घोळाबाबत महाविकास आघाडीच्या प्रमुख मंडळींनी आज निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यांना निवेदन देण्यात आले आहे. बुधवारी दुपारी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक होणार आहे. या बैठकीला महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.
जयंत पाटील,
सरचिटणीस, शेतकरी कामगार पक्ष





