संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन
| अलिबाग | प्रतिनिधी |
यंदाचे वर्ष भारतीय संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमातून संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे केले जाणार आहे. यानिमित्त पीएनपी नाट्यगृहात दि. 16 व 17 ऑक्टोबर रोजी दोन दिवस कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
‘गौरव गाथा संविधानाची’ या कार्यक्रमाची संकल्पना ॲड. आशिष शेलार, मंत्री सांस्कृतिक कार्य यांची असून, या कार्यक्रमास मार्गदर्शन डॉ. किरण कुलकर्णी, सचिव सांस्कृतिक कार्य विभाग यांचे लाभले आहे. भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कलाकारांना व्यासपीठ मिळणार आहे. पी.एन.पी. नाट्यगृह अलिबाग या ठिकाणी दि. 16 व 17 ऑक्टोबर रोजी दोन दिवस सायंकाळी 6.30 ते 10 या वेळेत सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते. दि.16 ऑक्टोबर रोजी ‘राष्ट्रग्रंथ-आधारस्तंभ लोकशाहीचा’ हे प्रसाद थोरवे आणि अभिराम भडकमकर लिखित, कुमार सोहोनी दिग्दर्शित दोन अंकी नाटक सादर केले जाणार आहे. तर, दि. 17 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6.30 ते 10 या वेळामध्ये लोकशाहीर विठ्ठल उमप थिएटर प्रस्तुत ‘गौरवगाथा संविधानाची’ हा कार्यक्रम ‘एकच राजा येथे जन्मला’ फेम गायक रोहित पाटील, योगेश काळबेरे, ‘अलिबागचा कुलाबा किल्ला फेम’ गायिका रेश्मा पाटील, ज्ञानराज पाटील, प्रतीक नाईक, आशुतोष पोटे, राजेंद्र जाधव आणि सहकारी यांनी सादर केलेल्या भव्य अशा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. रसिक प्रेक्षकांनी या सर्व कार्यक्रमांचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन संचालक सांस्कृतिक कार्य संचालनालय विभीषण चवरे यांनी केली आहे.






