सोमवार पासून उपोषण
| नेरळ | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील मोठ्या लोकवस्तीच्या नेरळ ग्रामपंचायत मधील कर्मचाऱ्यांचा अनेक महिन्यांचा पगार थकला आहे. त्यामुळे कामगारांच्या थकीत पगार आणि अन्य समस्या यांच्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना महापालिका कर्मचारी महासंघ यांच्या वतीने सोमवार (दि.11) मार्च पासून उपोषण केले जाणार आहे.
नेरळ ग्रामपंचायतमध्ये कामगारांची संघटना म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना महापालिका कर्मचारी कामगार महासंघ ही संघटना कार्यरत आहे. येथील कामगारांचा थकीत पगाराचा प्रश्न गंभीर असून काही दिवसापूर्वी एका कामगाराने पगार मिळत नसल्याने आत्महत्या केली होती. मात्र तरी देखील नेरळ ग्रामपंचायत प्रशासनाकडून थकीत पगार मिळवून देण्यासाठी प्रशासन सकारात्मक नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कर्मचारी संघटनेच्या वतीने सोमवार (दि.11) मार्च पासून नेरळ गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात उपोषण केले जाणार. ग्रामपंचायत मधील कार्यरत असलेले आरोग्य, पाणी पुरवठा, दिवाबत्ती कर्मचारी यांचे गेली दहा महिन्यापासून थकीत असलेले वेतन थकले आहेत. त्यामुळे बँकेतून घेतलेल्या कर्जापोटी ग्रामपंचायतीने कर्मचाऱ्यांच्या पगारातून कपात केलेली बँकेच्या हप्त्याची रक्कम बँकेत जमा केले नाहीत. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या पगारातून कपात केलेली प्राव्हिउंट फंडाची रक्कम पोस्टात न भरणे बाबतीत निर्णय घेतला जात नसल्याने कर्मचारी उपोषणाला बसणार आहेत. ग्रामपंचायतीच्या याच आडचणी मुळे धोरणापायी जीवाला कंटाळून गेल्या महिन्यात ग्रामपंचायत सफाई कर्मचारी यांनी आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली आहे त्याचे हे ताजे उदाहरण आहे.
ग्रामपंचायत कार्यालयात कार्यरत असलेले काही प्रशासकीय आणि पाणीपट्टी वसूली आणि पाणीपट्टी विभाग सांभाळणारे काही कर्मचारी, सरपंच व सदस्यांच्या मनमानी आणि अनियमिततेमुळे ग्रामपंचायतीला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे, असा आरोप मनसे कडून करण्यात येत आहे. कामगारांनी यशोमंदिर सहकारी पतपेढी मर्यादित मुंबई व शिवकृपा पतपेढी संस्था यांचेकडील कर्जे घेतली आहेत. त्यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या पगारातून कपात केलेली रक्कम देखील ग्रामपंचायत बँकेत जमा करीत नाही आणि त्यामुळे कर्जाच्या रकमेचा व्याजाचा बोजा कर्मचाऱ्यांना सहन करावा लागात आहे अशी गंभीर परिस्थिती आणि वस्तुस्थिती आहे. कर्जत तालुका तहसीलदार, कर्जत पंचायत समिती गटविकास अधिकारी आणि नेरळ पोलीस ठाणे यांना कर्मचारी संघटनेचे वतीने अध्यक्ष सुभाष नाईक, उपाध्यक्ष चंद्रकांत राठोड, उपाध्यक्ष हेमंत चव्हाण, गणेह चंचे, सरचिटणीस महेंद्र निगुडकर, सह सचिव संतोष दरवडा, आदी कर्मचाऱ्यांचे सह्या आहेत.