| पनवेल | ग्रामीण प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या लेडीज बार आणि ऑर्केस्ट्रा बारविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच, हे बार कायमस्वरूपी बंद करण्याच्या मागणीसाठी दि.19 जुलैपासून पनवेलमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा मनसेचे पनवेल महानगर अध्यक्ष योगेश चिले यांनी केली. या संदर्भात शनिवारी (दि.20) पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
या पत्रकार परिषदेत बोलताना चिले यांनी प्रशासनावर गंभीर आरोप करत, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड जिल्ह्यात महिलांना बारमध्ये नाचवण्याचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. लेडीज बारच्या आड अनेक अनैतिक आणि बेकायदेशीर धंदे सुरू असून, प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे,” असा आरोप केला. तसेच, लेडीज बार आणि ऑर्केस्ट्रा बारमध्ये शासकीय नियमांचे खुलेआम उल्लंघन होत असून, अनेक ठिकाणी गैरकृत्यांना प्रोत्साहन मिळत असल्याचा दावा त्यांनी केला. पनवेलसह पुणे, पिंपरी-चिंचवड आणि इतर भागांतील नागरिक या बारमध्ये येत असल्याने अनेक तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त होत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. अधिवेशनात हा विषय उपस्थित झाल्यानंतर काही काळ ऑर्केस्ट्रा बार बंद करण्यात आले होते. मात्र, ते पुन्हा सुरू कसे झाले? याबाबत प्रशासनाने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी चिले यांनी केली. मनसेच्या या आक्रमक भूमिकेमुळे रायगड जिल्ह्यातील लेडीज बारचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, प्रशासनाची भूमिका काय राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







