मोबाईल क्रमांक बदलाचा सर्वसामान्यांना फटका

महावितरणच्या समस्यांबाबत नागरिकांना माहिती देण्यास अडथळे
| अलिबाग | प्रतिनिधी |
ग्राहकांशी थेट संपर्क व्हावा यासाठी महावितरण विभागामार्फत वोडाफोन कंपनीच्या विशिष्ट क्रमांकाचे मोबाईल सीमकार्ड अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांनाच देण्यात आले होते. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून हे क्रमांक बंद स्थितीत आहेत, त्याचा फटका जिल्ह्यातील ग्राहकांना बसू लागला आहे.

रायगड जिल्ह्यात शहरासह ग्रामीण भागात, वाड्या वस्त्यांमध्य सेवा पोहचविण्याचा प्रयत्न महावितरण विभाग करीत आहे. वीज पुरवठा खंडीत होणे, तार तुटणे, विद्युत खांबाला गंज लागणे, खांब वाकणे अशा अनेक समस्या सोडविण्यासाठी पूर्वी महावितरणच्या कार्यालयात जाऊन चपला झिजवाव्या लागत होत्या.थेट ग्राहकांशी संपर्क व्हावा यासाठी महावितरण विभागाने कार्यालयातील अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांना 787576 या मालिकेचे मोबाईल क्रमांक दिले. यावर ग्राहक थेट अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत संपर्क साधून विजेच्या समस्या मांडू शकतात, अशी व्यवस्था केली. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र गेल्या काही दिवसांपासून महावितरणचे हे मोबाईल क्रमांक बंद आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांशी संपर्क होण्यास अडचणी निर्माण होत आहेत.

आता नवे मोबाईल नंबर दाखल
महावितरण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी वोडाफोन कंपनीचे मोबाईल सीमकार्ड देण्यात आले होते. मात्र काही वेळा संपर्क होण्याची समस्या असल्याने ग्राहकांशी संपर्क न होण्याचे प्रकार वाढले होते. त्यामुळे महावितरण कंपनीने आता एअर टेल कंपनीचे मोबाईल सीमकार्ड अधिकाऱ्यांसह वायरमनला देण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत अलिबाग, रोहा, पनवेल ग्रामीण व पेण विभागातील कार्यालयात सुमारे 170 जणांना 9029 या मालिकेचे क्रमांक देण्यात आले आहेत. त्यामुळे आता ग्राहक या क्रमांकावर वीज कर्मचाऱ्यांशी संपर्क साधू शकतात, अशी माहिती महावितरण कंपनीच्या कार्यालयातून देण्यात आली.

Exit mobile version