श्रीवर्धनमध्ये भ्रमणध्वनी सेवा विस्कळीत

प्रशासनाचे आपत्कालीन संदेश नागरिकांपर्यंत पोहोचण्यास अडथळा

| श्रीवर्धन | प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यात आगामी काही तासांत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवत मंत्रालयाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देणारे आपत्कालीन संदेश पाठवले जात आहेत. मात्र, दुसरीकडे श्रीवर्धन तालुक्यातील अनेक ठिकाणी गेल्या वीस दिवसांपासून भ्रमणध्वनी नेटवर्कची सेवा विस्कळीत झाल्याने हे महत्त्वाचे संदेश नागरिकांपर्यंत वेळेत पोहोचतच नसल्याचे विदारक चित्र समोर आले आहे.

स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीवर्धन तालुक्यात वारंवार नेटवर्क गायब होत आहे. नामांकीत भ्रमणध्वनी सेवा पुरवठादार कंपन्यांकडे वारंवार तक्रारी करूनही यावर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. प्रशासनाकडून सुरक्षेच्या सूचना तर येत आहेत, पण भ्रमणध्वनीला नेटवर्कच नसल्यामुळे वेळेवर संपर्क साधणे अशक्य झाले आहे. गेल्या वीस दिवसांपासून आम्ही या समस्येचा सामना करत आहोत, अशी संतप्त प्रतिक्रिया एका त्रस्त नागरिकाने व्यक्त केली.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नैसर्गिक आपत्तीची शक्यता असताना भ्रमणध्वनी सेवा अशी ठप्प राहणे नागरिकांच्या जीवितासाठी धोक्याचे ठरू शकते. त्यामुळे संबंधित दूरसंचार कंपन्यांनी तात्काळ ही तांत्रिक अडचण दूर करावी आणि प्रशासनाने देखील या गंभीर बाबीकडे त्वरित लक्ष देऊन सेवा सुरळीत करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी आता श्रीवर्धन तालुक्यातून जोर धरू लागली आहे.

Exit mobile version