| आगरदांडा | प्रतिनिधी |
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभाग अंतर्गत जिल्हा परिषद शाळेमध्ये कार्यरत शिक्षकांना दरवर्षी जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात येते. यावर्षी मुरूड तालुक्यातील रा.जि.प. शाळा खामदे येथे कार्यरत असणारे हेमकांत गोयजी यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार 2025 जाहीर झाल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी माध्यमाद्वारे कळविले आहे.
हेमकांत गोयजी यांनी 20 वर्षाच्या सेवा काळात उल्लेखनीय कार्य केले. ते उपक्रमशील शिक्षक असून ते विविध स्तरांवर काम करतात. त्यांनी विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरतील अशा कृतिपुस्तकांची निर्मिती केली आहे. तसेच राज्य व जिल्हा स्तरावर शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी तज्ञ मार्गदर्शकाची भूमिकाही बजावली आहे.
शाळेच्या विकासासाठी ते स्वंयसेवी संस्था, दानशूर व्यक्तीकडून शाळा सुधार निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करतात. त्याचबरोबरीने शासकिय योजनांचा लाभ विद्यार्थ्यांना मिळावा यासाठी पाठपुरावा करतात. आत्तापर्यंत त्यांनी शिकविलेले विद्यार्थी बँक, हॉटेल, सरकारी आस्थापनेवर कार्यरत झाले आहेत. तर काही विद्यार्थी व्यवसाय करीत आहेत.
हेमकांत गोयजी यांना आदर्श शिक्षक पुरस्कार
