| रायगड | प्रमोद जाधव |
आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर होऊन देखील जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत प्रत्यक्ष पुरस्कार वितरण समारंभ चार वर्षे घेतलाच नाही. त्यामुळे जिल्ह्यातील 120 आदर्श शिक्षकांना प्रत्यक्ष पुरस्कार वितरणाची प्रतिक्षा लागून राहिली होती. अखेर ही प्रतिक्षा संपली असून, सोमवारी (दि.13) शिक्षकांना आदर्श पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.
रायगड जिल्ह्यात तीन हजारहून अधिक शाळा असून, त्यात 2 हजार 501 जिल्हा परिषद शाळा, या शाळांमध्ये 5 हजार 888 शिक्षक असून 87 हजार 92 विद्यार्थी या शाळांमध्ये शिक्षण घेत आहे. या विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम शिक्षक करतात. शासनाच्या वेगवेगळ्या शैक्षणिक व अशैक्षणिक योजनांचे काम शिक्षक करतात. डिजीटल शिक्षण देण्याबरोबरच खेळता- खेळता शिक्षण यावरही अनेक शिक्षक भर देत आहेत.
आदर्शवत काम करणाऱ्या शिक्षकांना आदर्श पुरस्कार देऊन जिल्हा परिषदेमार्फत गौरव केला जातो. या पुरस्कारामुळे शिक्षकांना एक प्रेरणा मिळते. हा पुरस्कार म्हणजे आदर्शवत शिक्षकांसाठी नवी ऊर्जा देणारे आहे. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून पाच सप्टेंबरला दरवर्षी साजरा केला जातो. या दिनानिमित्त जिल्ह्यातील आदर्शवत शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित केला जातो. सन्मानपत्र देऊन हा गौरव केला जातो. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या या पुरस्काराचे महत्व वाढले आहे. रायगड जिल्हा परिषदेमार्फत आदर्श शिक्षक पुरस्कार वितरणाची ही परंपरा गेल्या अनेक वर्षापासून सूरू आहे. परंतु, या पुरस्कार वितरणाला गेल्या चार वर्षापासून ब्रेक लागला होता.
जिल्हा परिषदेवर 21 मार्च 2022 पासून प्रशासकीय राजवट सुरु झाल्यापासून ही परंपरा थांबली होती. दरवर्षी पाच सप्टेंबरपूर्वी आदर्श शिक्षकांची यादी जाहीर केली जात होती. परंतु, त्यांचा प्रत्यक्ष सन्मान करण्यास जिल्हा परिषद प्रशासनाकडून झालाच नाही. त्यामुळे 120 आदर्श शिक्षकांना प्रत्यक्ष सन्मानाची प्रतिक्षा लागून राहिली होती. अखेर ही प्रतिक्षा संपण्याच्या वाटेवर आहे. जिल्हा परिषद शिक्षण विभागाने सोमवारी (दि.13) आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला आहे. कुरुळ येथील आरसीएफ वसाहतीच्या सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे आदर्श शिक्षकांना हा सन्मानाचा आणि आनंदाचा क्षण असणार आहे.
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी यांच्यामुळे चार वर्षानंतर आदर्श शिक्षकांचा सन्मान होत आहे, याचा आनंद आहे. दरवर्षी शिक्षकांचा सन्मान होणे गरजेचे आहे. तो झाला पाहिजे. शिक्षकांचा सत्कार वेळच्या वेळी करावा ही अपेक्षा आहे. 120 शिक्षकांचा सोमवारी सन्मान होणार आहे. त्यामुळे तो यथोचित सन्मान करण्यात यावा.
राजेश सुर्वे- अध्यक्ष
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद





