पर्यटकांसाठी पुरातत्व विभागाचा उपक्रम
| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरुड- राजपुरी ग्रामपंचायत हद्दीतील ऐतिहासिक जंजिरा किल्ला पाहण्यासाठी दिघी जेट्टी, खोरा जेट्टी व राजपुरी जेट्टीवरुन देश-विदेशातुन लाखो पर्यटक ये-जा करतात. बहुतांशी पर्यटक राजपुरी जेट्टीवरून आकर्षक शिड्याच्या बोटीतुन किल्ला बघण्यासाठी जातात. बोट किल्ल्याकडे पोहोचण्याच्या आत बोटचालक पर्यटकांना किल्ल्याची माहिती थोडक्यात सांगत असतात. परंतु, काही देश-विदेशीतील पर्यटकांना कळत नसल्याने व समाधान होत नसल्याने नाराजी दिसून येत होती. ही नाराजी दूर करण्यासाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण मुंबई मंडळाने क्युआर कोड स्कॅन तयार केले आहे. या स्कॅनद्वारे ऑडिओतुन माहिती प्राप्त होणार आहे.
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण मुंबई, मंडळ बहुभाषिक स्मार्ट डिजिटल, ऑडिओ गाईड एएसआय, जंजिरा फोर्ट ई-वॉक ऑडिओ गाईड टुर स्कॅन आणि एक्सप्लोरद्वारे माहिती प्राप्त होणार आहे. पर्यटकांनी किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळील तिकीट बुकिंग कार्यालयाजवळ क्युआर कोड लावण्यात आले आहेत. त्याचा वापर करून स्कॅन करा आणि ऐतिहासिक जंजिरा किल्ल्याची ऑडिआद्वारे माहिती ऐका ही ऑडिओ पाच मिनिटांची असुन यामध्ये हा किल्ला कोणत्या वर्षी बांधला, कोणी बांधला, कसा बांधला, या किल्ल्यात किती तोफा आहेत, यांची माहिती सांगण्यात आली आहे. तरी जंजिरा फोर्ट ई-वॉक ऑडिओ गाईड स्कॅन करा, असे आवाहन पुरातत्व विभागाचे सहाय्यक संवर्धक अधिकारी बजरंग येलीकर यांनी केले.
यावेळी पर्यटक आकाश मोरे यांनी या क्युआर कोडद्वारे जंजिरा किल्ल्याची ऑडिओद्वारे माहिती ऐकली. तसेच ही सुविधा उपलब्ध करून दिल्याने समाधान व्यक्त केले. तसेच या ठिकाणी वायफाय सेवेची अत्यंत आवश्यकता आहे. नेट नसेल तर या क्युआर कोडचा काहीही फायदा होणार नाही. तरी पुरातत्व विभागाने ही सेवा उपलब्ध करून द्यावी. जेणेकरून या क्युआर कोडद्वारे किल्ल्याची माहिती प्राप्त होईल. आज पुरातत्व विभागाचे बहुउद्देशीय कर्मचारी प्रकाश घुगरे यांनी किल्ल्यासंदर्भात चांगली माहिती दिली, अशी प्रतिक्रिया नांदेड येथील आकाश मोरे यांनी दिली.





