डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आधुनिक फॉगिंग मशीन

| माणगाव| प्रतिनिधी |

शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी माणगाव नगरपंचायततर्फे उपाययोजना करण्यात येत आहेत. डासांच्या वाढत्या प्रमाणाने माणगाव शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळेच नगरपंचायतीने धूर फवारणी करावी, अशी मागणी वेळोवेळी नागरिकांकडून करण्यात येत होती. याची दखल घेत नगरपंचायतीने आधुनिक धूर फवारणी मशीनची खरेदी केली असून दोन नवीन ट्रॉली आणि आधुनिक फॉगिंग मशीनचे प्रात्यक्षिक करण्यात आले.

नगरपंचायत परिसरात धूर फवारणी करून शहरात मशीन सेवेसाठी सज्ज असल्याचे या वेळी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी संतोष माळी यांनी सांगितले. छोट्या ट्रॅकरच्या साह्याने संपूर्ण शहरात फवारणी करण्यात येणार आहे. माणगाव शहरातील विविध भागात धूर फवारणी करण्यात येणार आहे. मशीनमधून धुराबरोबरच बाष्पनिर्मिती होते. त्यामुळे धूर जमिनीबरोबर जास्त वेळ राहतो. त्यामुळे डासांचे निर्मूलन करण्यासाठी नवीन मशीन अधिक प्रभावीपणे काम करू शकते, असे मुख्याधिकऱ्यांनी सांगितले. या वेळी माणगाव नगर पंचायतीचे नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, आरोग्य व स्वच्छता सभापती दिनेश रातवडकर, पाणीपुरवठा सभापती कपिल गायकवाड, नगरसेवक सचिन बोंबले, नगरसेवक अजित तार्लेकर, माजी स्वीकृत नगरसेवक नितीन बामगुडे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

Exit mobile version