चिरनेर | वार्ताहर |
तीन कृषी कायदे आणून मोदी सरकारने देशातील शेतीव्यवस्थाच संपवायला आणली.याविरुद्ध शेतकर्यांनी उग्र आंदोलन सुरू केले. गेले अकरा महिने आंदोलन करणार्या शेतकर्यांपुढे मोदी सरकारला झुकावे लागले असून अखेर शेतकरी वर्गावर अन्याय करणारे काळे कायदे रद्द करावे लागले. ही देशातील शेतकर्यांनी केलेली क्रांती असून त्यामुळे मोदी सरकार पूर्णपणे बॅकफूटवर गेले आहे असे स्पष्ट प्रतिपादन रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र घरत यांनी केले आहे.मोदी सरकारने अन्याय्य कृषिकायदे रद्द केल्यावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
या आंदोलनात सुमारे 700 शेतकर्यांनी बलिदान केले असून त्यांच्या या त्यागापुढे अखेर मोदी सरकारला झुकावे लागून ते अन्याय्य कायदे अखेर मागे घ्यावे लागले.हा शेतकर्यांच्या असीम त्यागाचा विजय असल्याचे महेंद्र घरत यांनी स्पष्ट केले आहे.
उरण काँग्रेस कार्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेत महेंद्र घरत यांच्यासह जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर, महिला काँग्रेस तालुकाध्यक्षा रेखा घरत,विधानसभा महिला काँग्रेस अध्यक्षा संध्या ठाकूर,मच्छिमार नेते मार्तंड नाखवा,अकलाख शिलोत्री, कमलाकर घरत,सदानंद पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.