मोहम्मद नजीर यांचे निधन

। लाहोर । वृत्तसंस्था ।

पाकिस्तानचे महान क्रिकेटपटू आणि पंच मोहम्मद नजीर यांचे वयाच्या 78व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांची प्रकृती बर्‍याच दिवसांपासून खराब होती. मोहम्मद नजीर यांचा मुलगा नौमन नजीर याने वडिलांच्या निधनाची बातमी दिली आहे. नजीर यांनी पाकिस्तानसाठी 14 कसोटी आणि 4 एकदिवसीय सामने खेळले आहेत. मात्र, ते त्यांच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीसाठी सर्वाधिक ओळखले जात होते.

काही दिवसांपूर्वी नजीर खूप आजारी पडले होते. त्यांना छातीत जंतुसंसर्ग झाला होता आणि ते जलोदर नावाच्या आजारानंही ग्रस्त होते. त्यांच्यावर लाहोरमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. या दिग्गज पाकिस्तानी क्रिकेटरची तब्येत ढासळण्याचे एक कारण म्हणजे ते 5 वर्षांपूर्वी एका अपघाताचे बळी ठरले होते. त्यानंतर त्यांना सतत आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत होते. मोहम्मद नजीर उजव्या हाताने ऑफ-स्पिन गोलंदाजी करायचे. त्यांनी पाकिस्तानसाठी 14 कसोटी सामन्यात 34 बळी घेतले आहेत. याशिवाय 4 एकदिवसीय सामन्यात त्यांच्या नावावर 3 बळी आहेत. त्यांना त्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीपेक्षा प्रथम श्रेणी कारकिर्दीच्या आकडेवारीसाठी अधिक ओळखले जायचे. नजीर यांनी आपल्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत 180 सामने खेळले, ज्यात त्यांनी तब्बल 829 बळी घेतले आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यांनी दोन शतकी खेळीसह 4 हजार 242 धावाही केल्या आहेत.नजीर यांनी क्रिकेट कारकीर्द संपल्यानंतर अंपायरिंगही केले आहे.

Exit mobile version