विश्वविक्रम करण्यासाठी संघर्ष
| विम्बल्डन | वृत्तसंस्था |
गेल्या सहा स्पर्धांपासून ग्रॅण्डस्लॅमच्या रौप्य महोत्सवी जेतेपदासाठी झगडत असलेला टेनिस किंग नोव्हाक जोकोविच पुन्हा एकदा सज्ज झाला आहे. सात वेळा विम्बल्डनच्या हिरवळीवर चॅम्पियन ठरलेल्या जोकोविचसाठी ग्रॅण्डस्लॅमचा रौप्य महोत्सव साजरा करण्याची यंदा सुवर्ण संधी असल्याचे त्याने सांगितले आहे. तसेच, गेल्या सहा ग्रॅण्डस्लॅम स्पर्धांमध्ये घडले नाही ते विम्बल्डनमध्ये घडेल, असा विश्वास देखील जोकोविचने बोलून दाखवला आहे.
ग्रॅण्डस्लॅम टेनिसच्या इतिहासातील सर्वाधिक 22 ग्रॅण्डस्लॅम जिंकण्याचा राफाएल नदालचा विक्रम जोकोविचने 2023 सालीच फ्रेंच ओपन जिंकून मोडला होता. सप्टेंबर 2023 ला डॅनिल मेद्वेदेवला नमवत आपल्या कारकीर्दीतील 24 वे ग्रॅण्डस्लॅम जिंकण्याचा पराक्रम केला होता. अमेरिकन ओपनमध्ये त्याने आपले 24 वे ग्रॅण्डस्लॅम जिंकत टेनिस इतिहासात सर्वाधिक 24 ग्रॅण्डस्लॅम जिंकणाऱ्या मार्गारेट कोर्टच्या पराक्रमाची बरोबरी साधली होती. तेव्हापासून जोकोविच 25 वे ग्रॅण्डस्लॅम जिंकून विश्वविक्रम करण्यासाठी संघर्ष करत आहे. मात्र, यश त्याच्या पदरी अद्याप पडलेले नाही.
2024 च्या ऑस्ट्रेलियन ओपनपासून जोकोविच सातत्याने खेळत आहे. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीपर्यंत त्याने धडक मारली होती. त्यानंतर फ्रेंच ओपनमध्ये तर तो सुसाटच होता; मात्र, उपांत्यपूर्व फेरीत गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्याला माघार घ्यावी लागली आणि त्याचे स्वप्न पुन्हा एकदा अपुर्णच राहिले. विम्बल्डनच्या हिरवळीवर त्याला पंचकाची (सलग पाचवे जेतेपद) संधी होती. परंतु, कार्लोस अल्कराझने त्याचे पंचकही होऊ दिले नाही आणि त्याचे रौप्य महोत्सवाचे स्वप्नही भंग केले. गेल्या अमेरिकन ओपनमध्ये तो तिसऱ्याच फेरीत बाद झाला, मात्र या वर्षी झालेल्या दोन्ही ग्रॅण्डस्लॅमच्या उपांत्य फेरीपर्यंत त्याने धडक मारली आहे. मात्र, विम्बल्डनकडून जोकोविचला जेतेपदाच्या अपेक्षा आहेत. गेल्या सहा विम्बल्डन (2020 सोडून) स्पर्धांच्या अंतिम फेरीत जोकोविच खेळला आहे. त्याचाच अर्थ यावेळीही जोकोविचला अंतिम फेरीपासून कुणीही रोखू शकणार नाही.
शेवटची विम्बल्डन
जोकोविचने फ्रेंच ओपनच्या उपांत्य फेरीत पराभूत झाल्यानंतर ज्या पद्धतीने लालमातीला सलाम केला, चाहत्यांना अभिवादन केले, त्यावरून ही त्याची शेवटची स्पर्धा असल्याचा अंदाज लावण्यात आला. त्यामुळे विम्बल्डनच्या पूर्वसंध्येलाही त्याला निवृत्तीबाबत छेडण्यात आले आणि त्यानेही नेहमीचीच टेप लावली. तो म्हणाला, हे माझे शेवटचे ग्रॅण्डस्लॅम असू शकते का? मी याबाबत अजून काहीही बोलू शकत नाही. पुढच्या वर्षी फ्रेंच ओपन किंवा अन्य ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेत खेळेन की नाही, याबाबतही कल्पना नाही. मला अजूनही काही वर्षे खेळायचेय. मी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त राहू इच्छितो. हेच माझे ध्येय आहे. पण वयाच्या या टप्प्यावर पुढे काय होईल, हे कुणीही सांगू शकत नाही.
हिरवळीवरही अटीतटीची झुंज
सोमवारपासून सुरू झालेल्या विम्बल्डनमध्ये टेनिस विश्वातील सारेच दिग्गज हिरवळीवर उतरणार आहेत. गतविजेता कार्लोस अल्कराझ आपल्या जेतेपदाची हॅट्ट्रिक करण्यासाठी सज्ज झाला आहे. गेल्या दोन्ही स्पर्धांमध्ये त्याने जोकविचचा पराभव करत हे यश संपादले होते. तसेच, नंबर वन यानिक सिनर, ऍलेक्झांडर झ्वेरेव, डॅनिल मेद्वेदेव, जॅक ड्रपर असे अनेक नामांकित या स्पर्धेत आपला खेळ दाखवतील. तसेच, महिला एकेरीत गतविजेती बार्बोरा क्रेचिकोव्हा, कोको गॉफ, एरिना सबालेंका, जेसिका पेगुला, जास्मिन पाओलिनी, इगा स्विटेक जेतेपदासाठी संघर्ष करतील.