न्यूझीलंड संघाविरूद्ध खेळणार नाही
| मुंबई | वृत्तसंस्था |
भारतीय संघ बुधवार 15 ऑक्टोबरपासून मायदेशात न्यूझीलंड संघाविरूद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना बेंगळुरू येथे होणार आहे. दरम्यान, सामन्याच्या एक दिवस आधी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने पत्रकार परिषदेत अनेक प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. भारत-न्यूझीलंड या मालिकेबद्दल बोलताना रोहित शर्माने मोहम्मद शमीबाबत मोठा खुलासा केला आहे. मोहम्मद शमीअजूनही दुखापतीतून सावरलेला नाही. तो आता सुरू होणार्या न्यूझीलंड मालिकेचा भाग तर नाही, पण पुढील मालिकेत खेळू शकेल की नाही यावरही प्रश्नचिन्ह आहे.
मोहम्मद शमीबद्दल बोलताना रोहित शर्माने सांगितलं, ‘खरं सांगायचं तर ऑस्ट्रेलिया दौर्यावर शमीबाबत निर्णय घेणं खूप अवघड आहे. त्याला आणखी एक धक्का बसला असून त्याच्या गुडघ्याला पुन्हा सूज आली आहे. आता त्याला पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करावी लागेल. शमी एनसीएमध्ये डॉक्टर आणि फिजिओच्या देखरेखीखाली आहे. दुखापत असलेल्या शमीला ऑस्ट्रेलियाला घेऊन जाऊ शकत नाही. तो लवकर दुखापतीतून सावरेल अशी आशा आहे.’ मोहम्मद शमीच्या दुखापतीबद्दल अलीकडे आलेला रिपोर्ट काही प्रमाणात खरा असल्याचे रोहित शर्माच्या या विधानावरून खरा होता, अशीही चर्चा आहे.
शमीला पुन्हा दुखापत झाल्याची बातमी सोशल मीडियावर पसरली तेव्हा गोलंदाजाने लिहिले होते की, अशा निराधार अफवा का पसरवल्या जात आहेत आणि मी बरा होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. शमी म्हणाला की, बीसीसीआय आणि मी बॉर्डर-गावसकर मालिकेतून बाहेर असल्याचे म्हटलेले नाही. शमीने चाहत्यांना अशा बातम्यांकडे लक्ष देऊ नये असेही आवाहन केले होते. ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका पाच सामन्यांची असणार आहे. तर बॉर्डर गावसकर ट्रॉफी कसोटी मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतर्गत होणार आहे. पुढील वर्षी होणार्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये कोणते संघ अंतिम फेरीत खेळतील हे या मालिकेतून निश्चित होण्याची शक्यता आहे. सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. पण एखाद्या सामन्याच्या निकालानेही पूर्ण गुणतालिकेत बदल घडून येऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक सामना अत्यंत महत्त्वाचा असणार आहे.