| माणगाव | वार्ताहर |
येथील प्रसिद्ध अल्फा हॉस्पिटलचे डॉ. इस्माईल रहाटविलकर यांना वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल वैद्यकीय सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ. इस्माईल यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.
5 ऑक्टोबर 2024 रोजी कुणबी भवन हॉल निजामपूर रोड माणगाव याठिकाणी तालुका पत्रकार संघाच्या झालेल्या कार्यक्रमात त्यांना सन्मानित करण्यात आले.
डॉ. इस्माईल माणगाव तालुक्यातील साई गावचे सुपुत्र असून त्यांनी आपले वैधकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर सुरुवातीला माणगावात क्रिटीकेअर नावाने रुग्णालय सुरु केले. त्यांनतर त्यांनी माणगाव येथे मोर्बा रोड मार्गावर भव्य अशी इमारत उभारून तेथे अल्फा हॉस्पिटल नावाने आपले रुग्णालय सुरु केले. या रुग्णालयात ते दिवस-रात्र रुग्णांना सेवा देत असतात. त्यांचे हे हॉस्पिटल रायगड जिल्ह्यातील एकमेव हॉस्पिटल असून या हॉस्पिटलमध्ये गंभीर आजार व शस्त्रक्रियांसाठी शासनाची मुख्यमंत्री सहायता निधी उपलब्ध आहे. या सहायता निधीतून या ठिकाणी गंभीर आजारांवर तज्ज्ञ डॉक्टर येऊन रुग्णांवर उपचार करतात. त्यामुळे हे हॉस्पिटल नावारूपाला आले आहे.
आपला वैद्यकीय व्यवसाय सांभाळून डॉ.इस्माईल हे समाजात सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून काम करीत असतात. समाजातील गोरगरीब जनतेला, विध्यार्थ्यांना आपल्या परीने मदतीचा हात देत असतात. त्यांच्या या कार्याची दखल माणगाव तालुका पत्रकार संघाने घेत त्यांना मान्यवरांच्या हस्ते वैद्यकीय सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दरम्यान, डॉ. इस्माईल यांनी या पुरस्काराबद्दल आभार व्यक्त केले.







