रणजी सामन्यात बंगालकडून खेळणार
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारताचा दिग्गज वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी सध्या दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर आहे. मात्र, आता तो लवकरच स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याच्या उंबरठ्यावर आहे. यंदाच्या रणजी चषक स्पर्धेच्या सत्रात सुरुवातीच्या दोन सामन्यांमध्ये शमी बंगाल संघाकडून खेळणार असल्याची चर्चा आहे. या दोन रणजी सामन्यांनंतर तो मायदेशातील न्यूझीलंडविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील एका सामन्यात खेळू शकेल.
मिळालेल्या माहितीनुसार, शमी 11 ऑक्टोबरला यूपीविरुद्ध आणि 18 ऑक्टोबरला बिहारविरुद्धच्या सामन्यापैकी एका सामन्यात खेळू शकतो. या दोन्ही सामन्यांमध्ये केवळ दोन दिवसांचे अंतर असल्याने शमी दोन्ही सामन्यांत खेळण्याची शक्यता कमी आहे. न्यूझीलंडविरुद्धची तीन कसोटी सामन्यांची मालिका 19 ऑक्टोबरपासून बंगळुरू येथून सुरू होईल. यानंतर या मालिकेतील उर्वरित दोन सामने 24 ऑक्टोबरपासून पुण्यात, तर एक नोव्हेंबरपासून मुंबईत खेळविण्यात येतील. ऑस्ट्रेलियातील महत्त्वाच्या दौर्याआधी शमी या तीनपैकी एका सामन्यात खेळण्याची शक्यता आहे. शमीने गेल्या वर्षी 19 नोव्हेंबरला अहमदाबाद येथे झालेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना खेळला होता. हा त्याचा आतापर्यंतचा अखेरचा अंतिम आंतरराष्ट्रीय सामना ठरला. या सामन्यापासून शमी स्पर्धात्मक क्रिकेटपासून दूर आहे. यंदा फेब्रुवारीमध्ये इंग्लंडमध्ये शमीच्या घोट्यावर शस्त्रक्रिया झाली होती. तंदुरुस्तीसाठी मेहनत मोहम्मद शमी पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (एनसीए) घाम गाळत आहे. छोट्या रनअपसह कमी वेगाचा मारा करण्याचा सराव करतानाचा त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. या वर्षाच्या अखेरीस होणार्या ऑस्ट्रेलिया दौर्यासाठी शमी भारतासाठी महत्त्वाचा खेळाडू ठरणार आहे.