| मुंबई | प्रतिनिधी |
नऊ वर्षांच्या मुलीच्या विनयभंगाप्रकरणी 55 वर्षांच्या बिगारी कामगाराला मालवणी पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरुद्ध विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 29 वर्षांची तक्रारदार महिला ही मालाडच्या मालवणी परिसरात राहते. तिला नऊ वर्षांची मुलगी असून, ती सध्या शिक्षण घेते. याच परिसरात आरोपी राहत असून, तो बिगारी कामगार आहे. रविवारी (दि.15) दुपारी तीन वाजता ही मुलगी तिच्या मैत्रिणीकडे जात होती. या वेळी तिथे आरोपी आला आणि तो तिला बाजूलाच असलेल्या जंगलात घेऊन गेला. तिथे गेल्यानंतर त्याने तिला गळा दाबून जीवे मारण्याची धमकी देऊन तिचा विनयभंग केला. या घटनेमुळे ती प्रचंड घाबरली होती. घरी आल्यानंतर तिने घडलेला प्रकार तिच्या आईला सांगितला. त्यानंतर मुलीच्या आईने या प्रकरणी मालवणी पोलिसांत गुन्हा दाखल केला. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.