विळे येथे माकडाचा संचार

| सुतारवाडी | वार्ताहर |

गेल्या महिन्यापासून विळे परिसरात एका माकडाने संचार केला असून, तो कधी विळे नाक्यावर तर कधी बाजारपेठेत मुक्तपणे संचार करीत आहे. दुपारच्या दरम्यान हा माकड विळे नाक्यावर पुणे-माणगावकडे जाणार्‍या रस्त्यावर उभा असतो. कधी कधी हा माकड येथून जाणार्‍या चार चाकीबरोबर धावत जातो आणि काचेवर हाताची थाप मारतो. त्यामुळे प्रवाशांकडून भीती व्यक्त केली जात आहे.

विळे-भागाडमध्ये अनेक कंपन्या असल्यामुळे या परिसरात वास्तव्य करणार्‍यांची लोकसंख्या मोठी आहे. त्याचप्रमाणे माणगाव येथील हायस्कूल आणि कॉलेजमध्ये जाणारे विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर आहेत. त्या विद्यार्थ्यांना त्याने दुखापत केली तर मोठा अनर्थ होईल. गेल्या महिन्यापासून मुक्तपणे संचार करणार्‍या माकडाला वनविभागाने पकडून जंगलामध्ये सोडणे आवश्यक आहे. मात्र, अद्यापही जंगल खात्यातील अधिकारी वर्गाने दखल घेतलेली नाही.

Exit mobile version