तळोजात वानरांचा धुडगूस

| पनवेल । वार्ताहर ।

पनवेल तालुक्यातील तळोजा औद्योगिक वसाहतीलगत असलेल्या एन.ए.गार्डन या गृहसंकुलात वानरांनी धुडगूस घातला आहे. अन्नासाठी मानवी वस्तीत या वानरांचा वावर असल्याने लहान मुलांसह महिलांच्या सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

तालुक्यातील अनेक भागांत वन विभागाचे मोठे कार्यक्षेत्र आहे. या जंगलात वन्य प्राण्यांचे मुख्य निवासस्थान आहे. परंतु वाढते शहरीकरण, मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोड, ओसाड होणारे डोंगर, वाढत्या शिकारी, जंगलातील नागरिकांचा वाढता वावर, यामुळे धोक्यात आलेला निवारा यामुळे वन्य प्राणी मानवी वस्तीत शिरण्याच्या प्रकारांत वाढ झाली आहे. पनवेलच्या पूर्व भागातील वाढत्या शहरीकरणाचा फटका ग्रामीण व दुर्गम भागांमधील गावांनाही बसला असून गेल्या काही महिन्यांपासून तळोजा औद्योगिक वसाहतीमधील एन. के. गार्डन या विस्तीर्ण गृहसंकुलामध्ये वानरांचा वावर वाढला आहे. अनेकदा हे वानर अन्नासाठी लहान मुले आणि महिलांच्या अंगावर धावून जाण्याचे प्रकार घडल्यामुळे या ठिकाणी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे वन विभागाने तातडीने याबाबत उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

वन्यजीवांचा मानवी वस्तीत वावर
वृक्षतोडीमुळे जंगले ओसाड होत चालली आहेत. याचप्रमाणे गौण खनिज माती, मुरूम व डबर आदींचे अनेक व्यावसायिक सरकारी विभागांच्या अधिकार्‍यांच्या संगनमताने होत असलेले बेसुमार उत्खननामुळे अनेक टेकड्या नामशेष झाल्या आहेत. त्यामुळे मानवनिर्मित कृत्रिम कारणांमुळे वन्य प्राण्यांचा मानवी वस्तीतील वावर वाढला असून अनेक गावांतील नागरिकही रात्री उशिरा बाहेर पडण्यास घाबरत आहेत.

Exit mobile version