| पनवेल । वार्ताहर ।
तळोजा औद्योगिक क्षेत्रातून रात्री सोडण्यात येणार्या केमिकलमुळे होणार्या प्रदूषणावर लोकायुक्तांकडे सुनावणी सुरू आहे. याप्रकरणी 5 डिसेंबरला पुन्हा सुनावणी होणार असून प्रदूषणामुळे निर्माण होणार्या समस्यांची लेखी माहिती राज्य सरकार, लोकायुक्त कार्यालयाला देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
तळोजा रासायनिक औद्योगिक क्षेत्रातून रात्रीच्या वेळी सोडण्यात येणार्या केमिकलमुळे तळोजा, खारघर, कळंबोली, रोडपाली आणि कामोठे वसाहत तसेच परिसरात असलेल्या गावातील नागरिक हैराण आहे. या केमिकलच्या उग्र वासामुळे आजार बळावण्याची भीती नागरिकांमध्ये पसरली आहे. त्यामुळे तळोजा फेज दोनमध्ये वास्तव्य करणार्या ‘आदर्श सामाजिक संस्थे’च्या वतीने लोकायुक्तांकडे तक्रार करण्यात आली आहे. या तक्रारीची दखल घेऊन नुकतीच लोकायुक्तांच्या कार्यालयात सुनावणी घेण्यात आली. या वेळी राज्याचे लोक आयुक्त व्ही. एम. कानडे यांनी तळोजा औद्योगिक क्षेत्रातील उग्रवासामुळे नागरिकांना होणार्या त्रासाची लेखी माहिती राज्य सरकार आणि लोकायुक्त कार्यालयात सादर करण्याचे आदेश दिले. तसेच 5 डिसेंबरला निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले.