48 तासांत मान्सून महाराष्ट्रात

| मुंबई | प्रतिनिधी |

केरळ आणि गोव्यात धडक दिल्यानंतर मान्सून आता महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. पुढील 48 तासांत कोकणासह दक्षिण महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली असून, राज्यातील उकाड्याने त्रस्त नागरिकांना दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.

केरळमध्ये तीन दिवस उशिराने दाखल झालेला मान्सून आता वेगाने पुढे सरकत असून, शुक्रवारी गोव्यात पोहोचला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही मान्सून आगमनाची प्रतीक्षा संपण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील 48 तासांत कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्यासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे.

हवामान विभागाचे तज्ज्ञ प्रवीण कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनचा प्रवास यंदा काहीसा संथ असला तरी पुढील दोन दिवसांत तो महाराष्ट्रात प्रवेश करेल. राज्यात यंदाही मान्सून वेळेत पोहोचण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. कुडाळसह विविध भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या. जिल्ह्यात 10 ते 20 मिलीमीटर पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.

दुसरीकडे, परभणी जिल्ह्यातही मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उष्णतेमुळे हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. काही ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले, तर शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले. विदर्भात मात्र अद्याप उष्णतेची तीव्रता कायम राहणार असून तापमान 40 ते 42 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. 10 जूननंतर तापमानात घट होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. केरळ, गोवा आणि आता महाराष्ट्र असा मान्सूनचा प्रवास सुरू असून, पुढील दोन दिवसांत कोकण किनारपट्टीवर मान्सूनच्या सरी बरसण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे शेतकरी, नागरिक आणि प्रशासनाचे लक्ष आता मान्सूनच्या अधिकृत आगमनाकडे लागले आहे.

Exit mobile version