मोरबे धरणग्रस्तांनी व्यक्त केला संताप
| रसायनी | वार्ताहर |
धरणग्रस्तांनी आपल्या जमिनी मोरबे धरणासाठी दिल्यानेच आज नवी मुंबईसह पनवेल तालुक्यातील काही भागांना पिण्याचे पाणी मिळत आहे. मात्र नवी मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना धरणग्रस्तांचे म्हणणे ऐकून घेण्यास वेळ नाही. भेटायचे असेल तर कार्यालयात येऊन भेटा, अशी अरेरावीची भाषा वापरली. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी याविरोधात संताप व्यक्त केला आहे.
मोरबे धरण येथे नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त येणार असल्याची माहिती धरणग्रस्तांना मिळाली. त्यांची भेट घेण्यास मोजकेच प्रतिनिधी तेथे गेले. कार्यकारी अभियंता सोनावणे यांना दोन मिनिट वेळ द्या, अशी विनंती त्यांनी केली. पण निवेदन घेणे अथवा भेट देणे अधिकाऱ्यांनी टाळले. तुम्ही नवी मुंबई महानगरपालिका कार्यालयात येऊन भेटा, असे सांगितले. त्यामुळे मोरबे धरणग्रस्त जनतेचा अपमान कार्यकारी अभियंता सोनावणे यांनी केल्याची धारणा झाल्याने त्यांनी संताप व्यक्त केला.
दरम्यान, कनिष्ठ अभियंता मोरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही, तसेच पत्रकारांशी बोलण्यास देखीलनकार दिला. अनेक वर्षांच्या समस्यांबाबत आयुक्तांची भेट घेणे महत्वाचे होते. गणपती आगमन कालावधीत काही आदिवासी बांधवांचा पाणीपुरवठा खंडित झाला होता. त्याचप्रमाणे पथ दिवे बंद होते. याबाबतचे गाऱ्हाणे आयुक्तांना घालण्यात येणार होते. मात्र तेथील अधिकारी सोनावणे यांनी कोणतीच माहिती दिली नाही. उलट भेट न घेताच ते धरणाच्या दुसऱ्या गेटकडे निघून गेले. तुमचे प्रश्न शासनाकडे मांडा, असा सल्ला दिला. मोरबे धरणग्रस्त प्रतिनिधी आल्याची खबर चौक पोलिसांना देण्यात आली, सपोनि युवराज सूर्यवंशी यांना भ्रमणध्वनी केला. पोलिस बंदोबस्त आहे. तुम्ही धरणग्रस्तांशी चर्चा करा, निवेदन स्वीकारा, असे सोनावणे यांना सांगितले. कोणताही अनुचित प्रकार नव्हता, प्रतिनिधी शांत होते, घोषणाबाजी नव्हती. उलट, पोलिसांनी सांगितल्यानुसार ते एका बाजूला उभे राहिले होते, तरीही कार्यकारी अभियंता सोनावणे तेथे आले नाहीत. त्यांनी बोलणी करण्यासाठी कनिष्ठ अभियंता मोरे यांना पाठवले.
कनिष्ठ अभियंता मोरे गेट वर आले, पण गेट न उघडताच गेटच्या पलीकडून त्यांनी धरणग्रस्तांशी संवाद साधला. आमचीच जागा, आमचेच धरण तरीही मोरबे धरण प्रशासनाची ही कसली दादागिरी, असा सूर धरणग्रस्तांनी आळवला. या ठिकाणी कार्यालय आहे, रेस्ट हाऊस आहे, मग रस्त्यात उभे ठेवून का बोलणी करता असा सवाल विचारण्यात आला. नवी मुंबई महानगरपालिका कार्यालयात जाऊन कुणीही दखल घेत नाही असा, अनुभव असल्याचे परशुराम मिरकुटे यांनी सांगितले. 34 वर्ष आम्ही फेऱ्याच मारत फिरत आहोत, कोणताच प्रश्न सुटत नाही असे जगन्नाथ पाटील यांनी सांगितले, तर नवी मुंबई महानगरपालिका कार्यालयावर लाँग मार्च काढण्याचा निर्णय ग्रुप ग्रामपंचायत चौकचे सदस्य राजू पाटील यांनी बोलून दाखवला. दरम्यान, कनिष्ठ अभियंता मोरे यांनी फोन घेतला नाही, तर सोनावणे यांचा फोन बंद होता. अन्य कर्मचारी पडघन यांच्याशी संपर्क साधला असता प्रशिक्षणासाठी बाहेर असल्याबाबतचा मेसेज पाठवला.