| अलिबाग | प्रतिनिधी |
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अलिबाग एसटी बस आगारातून ज्यादा एसटी बसेस सोडण्यात येणार आहे. अलिबाग-पनवेल विना थांबा व अलिबाग-पनवेल प्रत्येक ठिकाणी थांबा घेणाऱ्या वीस एसटी बसेसची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती आगार व्यवस्थापक अजय वनारसे यांनी दिली. गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबई, पुणे, बोरीवली, ठाणे येथील चाकरमानी आपल्या गावी येण्याच्या तयारीला लागले आहेत. 19 सप्टेंबरपासून गणेशोत्सव असल्याने चार दिवस अगोदरच चाकरमानी आपल्या कुटूंबियांसमवेत गावी येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये यासाठी अलिबाग एसटी बस आगाराने पनवेलपर्यंत ज्यादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
एकूण 20 बसेसची व्यवस्था केली आहे. त्यात विना थांबा 10 व थांबा घेणाऱ्या 10 बसेसचा समावेश आहे. 16 सप्टेंबरपासून ही सेवा सुरु केली जाणार आहे. गर्दीचा विचार करत प्रवास सुखकर व्हावा यासाठी ज्यादा बसेसची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती अजय वनारसे यांनी दिली.