गावठी वालाला सुगीचे दिवस , चवदार टपोऱ्या दाण्याच्या गावठी शेंगांच्या अधिक पसंती
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
सध्या रायगडात लज्जतदार पोपटीचा घमघमाट सुटला आहे. जिथ तिथं पोपटीचीच चर्चा व तयारी पहावयास मिळत आहे. पाली सुधागडसह जिल्हाभर सर्वत्र पोपटी पार्ट्यांची धम्माल सुरु आहे. सध्या गावठी वालाला सुगीचे दिवस आले आहेत. ठिकठकाणी शेतावर या पोपटी पार्ट्यांची धूम पहावयास मिळत आहे. फाईव्ह स्टार हॉटेलच्या पदार्थांपेक्षा कोकणी स्वादिष्ट पोपटी लयभारी, पोपटीची चव आणि बातच न्यारी असा सूर पोपटीप्रेमी, खवय्यांकडून ऐकावयास मिळत आहे.
![](http://krushival.in/grygrars/2024/01/IMG-20240121-WA0056-1024x503.jpg)
वालाच्या शेंगां भामरुडाच्या (भांबुर्डी) पाल्यात मडक्यामध्ये मोकळ्या आगीवर विशिष्ट पद्धतीने शिजविल्या जातात. त्यामध्ये कांदा व बटाटा तसेच अंडी, चिकन घालून त्यांची लज्जत वाढविली जाते. यालाच पोपटी असे म्हणतात. सध्या जिल्ह्यात सर्वत्र पोपटी पार्ट्यांची धम्माल सुरु झाली आहे. जिल्ह्याच्या मातीत पिकविलेल्या चवदार टपोऱ्या दाण्याच्या गावठी शेंगांच्या पोपटीला अधिक पसंती आहे. सध्या येथील स्थानिक गावठी शेंगा आता येण्यास सुरवात झाली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर नागोठण्याजवळील निडी गावातील शेंगा विशिष्ट गोड चव व टपोरे दाण्यांसाठी सर्वत्र प्रसिद्ध आहेत.
![](http://krushival.in/grygrars/2024/01/IMG-20240121-WA0051.jpg)
गावठी वालाला मागणी
पोपटी करण्यासाठी गावठी वालाच्या शेंगाना मागणी असते. जिल्ह्यात रब्बी हंगामात साधारण साडे पंधरा हजार हेक्टरवर कडधान्याचे पिक घेतले जाते. त्यामध्ये सर्वात जास्त म्हणजे जवळपास 4 हजार 381 हेक्टरवर वालाची लागवड केली जाते. वालाला सुरुवातीस दर चांगला मिळतो. किलोला 100 ते 120 रुपये. नंतर शेंगा सर्वत्र येऊ लागल्यावर शेवटी दर 40 ते 50 रुपये किलोपर्यंत जातो. लागवड व मशागत करण्यासाठी मेहनत लागते. वातावरणाने साथ दिल्यास चांगले उत्पन्न मिळते. शेंगा सुकवून त्यापासून मिळालेल्या वालाची विक्रीदेखील केली जाते.
आवश्यक साहित्य
गावठी वालाच्या किंवा पुण्याच्या भरलेल्या टपोऱ्या शेंगा, कांदा, बटाटा, मांसाहारी खाणारे असल्यास अंडी किंवा मसाला लावलेले चिकन, ओवा, जाडे मीठ व भामरुडीचा (भांबुर्डी) पाला आणि हे सर्व जिन्नस शिजविण्यासाठी मातीचे मोठे मडके व जळणासाठी लाकूड, पेंढा आणि गोणपाट इत्यादी.
भांबुर्डीच्या पाल्याचे विशेष
भांबुर्डीच्या पाल्याचे विशेष आहे. याला गोरखमुंडी, वसई-विरारमध्ये बोडथोला, काही ठिकाणी कोंबडा तर रायगडमध्ये भांबुर्डी किंवा भामरुड असे म्हणतात. पावसाळ्यानंतर हा पाला रस्त्याच्या कडेला माळरानात सर्वत्र उगवतो. या पाल्यात औषधी गुणधर्म असतात. जखम झाल्यास पालाच्याच रस जखमेवर चोळतात. पोपटीमध्ये हा पाला टाकल्याने पाणी नसतानादेखील याच्या वाफेवर शेंगा चांगल्या शिजतात. तसेच वालच्या शेंगा पोटाला बाधत नाहीत आणि लज्जतदार चवदेखील येते, हे याचे विशेष.
पत्र्याच्या डब्यातही करा पोपटी
पोपटीसाठी मडक्यांनादेखील खूप मागणी असते. मडके उपलब्ध नसल्यास त्याऐवजी तेलाच्या पत्र्याच्या डब्यामध्येही पोपटी केली जाते. यासाठी पत्र्याच्या डब्याचे तोंड तीन बाजूने कापलेले असते. अगदी मडक्यात लावतात त्याप्रमाणे कृती करुन पत्र्याचे झाकन घट्ट लावावे व आगीवर उपडे ठेवावे. काही वेळेला मडके फुटते किंवा त्याला तडा जातो आणि आतील साहित्य करपते किंवा अर्धवट शिजते. मात्र, पत्र्याच्या डब्यामध्ये ही भीती नसते. आणि तो वारंवार वापरतादेखील येतो.