अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या तोंडावर बोट
। उरण । वार्ताहर ।
आपल्या विविध कामाकरिता सर्व सामान्य जनतेला शासकिय कार्यालय गाठावे लागते. परंतु, कागदपत्राच्या अजाणतेपणामूळे येथे असलेले दलाल लहान-सहान कामांकरिता या लोकांना लक्ष्य करुन त्यांना आर्थिक भुर्दंड देत आहेत. याबाबत कार्यालयातील अधिकारी, कर्मचार्यांना माहिती असतानाही अशा दलालावंर अंकुश न लावताच तोंडावर बोट ठेवून गप्प बसत आहेत. त्यांचे असे गप्प बसण्यामागील काय कारण असावे? असा प्रश्न निर्माण होत आहे.
उरण तालुका हा तिसर्या मुंबईच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यामुळे येथील तहसील कार्यालयात शहरासह ग्रामीण भागातील नागरिक विविध कामे घेऊन येत असतात. शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, सर्वसामान्य नागरिकांचा यात समावेश असतो. एखाद्या महत्वाच्या कामासाठी दाखला हवा असतो. त्यासाठी लागणार्या कागदपत्रांमध्ये किंवा एखाद्या शासकीय योजनांसाठी एखादा कागद कमी असल्यास दाखल्याचा अर्ज त्रुटींमध्ये निघतो. याकरिता अधिकारी स्तरावर कुठलेही मार्गदर्शन होत नाही. त्यामुळे सर्व सामान्य जनतेला आपला पैसा आणि वेळ खर्चून अनेक वेळा हेलपाटे मारावे लागतात. परंतु, एखादा कागद कमी असलेला अर्ज दलालामार्फत सादर झाल्यास विना त्रुटी तो पास होतो, हा अनेक सुज्ञ नागरिकांचा अनुभव आहे.
तसेच, उरण तहसील कार्यालयाबरोबरच दुय्यम निबंधक, महावितरण, कृषी, वन, पंचायत समिती, उरण भूमी अभिलेख कार्यालयात तर अधिकारी आणि कर्मचार्यांपेक्षा दलालांचीच संख्या अधिक दिसते. कार्यालयाजवळ बेकायदेशीर बस्तान बसविलेल्या टपरी ठिकाणी हे हमखास आढळतात. शासकीय कार्यालयात कोणीही कर्मचारी वा अधिकारी योग्य ते मार्गदर्शन करत नसल्यामुळे याचा फायदा हे दलाल घेत असतात. संबंधित कार्यालयात येणारा आर्थिक परिस्थितीने जर्जर झालेला शेतकरी किंवा सर्व सामान्य जनता यांची दलालांकडून बाहेरच अडवणूक होते. संबंधित काम कसे करून घ्यायचे याचा सल्ला देतात. नाहिलाजाने आपल्या खिशाला आर्थिक भुर्दंड देत त्यांना दलालांचा आधार घ्यावा लागतो.
त्यामुळे भ्रष्टाचाराची किड नियंत्रणात आणण्यासाठी राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उरण येथील तहसील कार्यालयाबरोबर इतर शासकीय कार्यालयातील कामकाजाकडे लक्ष देणे गरजेचे असल्याची मागणी सर्व सामान्य जनतेकडून करण्यात येत आहे.
उरण तहसील कार्यालयात एकच अधिकृत सेतू केंद्र सुविधा असताना अनेकांनी शासकीय अधिकार्यांच्या आशिर्वादाने टपर्यांमधून आपला धंदा सुरू केला आहे. काही दलालांची शासकीय कार्यालयात कार्यरत असलेल्या कर्मचार्यांसोबत उठबस वाढली आहे. शिवाय, त्यांच्यासोबत चहापाणी घेणे, नाश्ता, पार्टी करणे अशी त्यांची दिनचर्याही सुरू झाली आहे. हा प्रकार दलालांसाठी पोषक ठरत आहे. तरी, मंत्र्यांनी हे कुठे तरी थांबविणे गरजेचे आहे.
– एस.एम. पाटील, शेतकरी, उरण