रायगडकरांनो सावधान! डेंग्यू पसरतोय; आत्तापर्यंत आढळले 25 रुग्ण

। रोहा । प्रतिनिधी ।
रोहा शहराच्या लगत असणार्‍या वरसे ग्रामपंचायत हद्दीत 25 पेक्षा अधिक डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन पंचायत समितीच्या आरोग्य विभागाने केले आहे.

बेकायदेशीर बांधकामे, तुंबलेली गटारे, स्वच्छतेचा अभाव, खड्डेमय रस्ते, सदोष सांडपाणी व्यवस्था यासाठी प्रसिद्ध असणार्‍या वरसे ग्रामपंचायत हद्दीत जागोजागी तुंबलेल्या पाण्यामुळे डेंग्यूच्या डासांचे साम्राज्य झाले आहे. याचा फटका जनतेला बसत आहे.

या ग्रामपंचायतीची एकहाती सत्ता आहे. वर्षानुवर्षे एकाच पक्षाच्या हाती सत्ता दिल्याने ग्रामपंचायत सुजलाम सुफलाम होईल अशी येथील जनतेची भाबडी अपेक्षा होती. पण रस्ते, पाणी, गटारे या मूलभूत सुविधा निर्माण करण्यात देखील सत्ताधार्‍यांना अपयश आले असून बेकायदेशीर बांधकामांना दिलेल्या प्रोत्साहनामुळे येथील नागरिक डेंग्यूच्या विळख्यात अडकले असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

Exit mobile version