आघाडीत मतभेद?
| नागपूर | प्रतिनिधी |
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव ( आणण्यावरुन महाविकास आघाडीत मतभेद असल्याची चर्चा रंगली आहे. उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन काँग्रेसने प्रस्ताव दाखल केला. मात्र विरोधी पक्षांमधील 39 आमदारांच्या स्वाक्षर्या असलेल्या या ठरावाबद्दल आपल्याला कोणतीही कल्पना नसल्याचं खुद्द विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितलं. तसंच या प्रस्तावावर माझी स्वाक्षरी आवश्यक आहे, असंही अजित पवार म्हणाले. एक वर्षाच्या आत अविश्वास ठराव आणता येत नसल्याने आणि 14 दिवस आधीच ठराव आणावा लागतो, अशा काही तांत्रिक मुद्द्यांवर प्रस्ताव टिकू शकत नाही, म्हणूनच अजित पवार यांनी स्वाक्षरी केली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र या सगळ्या घडामोडींनंतर महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांमध्ये एकमत नसल्याची आणि अजित पवार यांचा विरोध डावलून हा प्रस्ताव सादर केला की काय अशी कुजबूज सध्या राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
विधानसभा अध्यक्षांवर अविश्वास ठराव आणल्याबद्दल मला काहीच माहित नाही, असं अजित पवार यांनी म्हटलं. आज भुजबळ साहेब पण नव्हते. मी उद्या याची माहिती घेतो. माहिती न घेता बोलणं योग्य वाटणार नाही. अविश्वास प्रस्तावाला जर माझी संमती असती तर त्यावर सही असती. मी या संदर्भामध्ये ाहिती घेऊन बोलतो. माझ्याकडे लपवण्याचं काही कारण नाही. – अजित पवार,विरोधी पक्षनेते