| नागोठणे | महेश पवार |
मुंबई- गोवा महामार्गावर सुकेळी खिंडीत नागोठणे बाजूकडील वळणावर विजय हॉटेलच्या समोर मोटरसायकलला अपघातात झाल्याची घटना सोमवारी (दि.7) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या अपघातात क्रिश देवा साउथी (नेपाळी) (20), सध्या रा. मुंबई, या तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून, मोटार सायकलवर या तरुणाच्या मागे बसलेली जास्मिन इकबाल इंद्रेशी (18), रा. घणसोली, सेक्टर 2 – ठाणे, ही तरुणी गंभीर जखमी झाली आहे. या तरुणीवर सुकेळी येथील जिंदाल हॉस्पिटलमध्ये अधिक उपचार सुरू आहेत.
या संदर्भात उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, अपघातातील मृत तरुण क्रिश देवा साऊथी (नेपाळी) हा त्याचे ताब्यातील मोटर सायकलवरून जास्मिन इंद्रेशी हिला सोबत घेऊन मुंबई- गोवा महामार्गावरून महाबळेश्वर ते मुंबई असा मोटारसायकल स्वतः चालवित घेऊन जात होता. सुकेळी गावच्या हद्दीतील सुकेळी खिंडीतील विजय हॉटेलच्या समोर वळणावर हा तरुण आला असता त्याचे मोटरसायकलवरील नियंत्रण सुटल्याने मोटरसायकल दोन्ही रस्त्याचे मधील दुभाजकाला धडकून अपघात झाला. या अपघातात मोटरसायकल चालक क्रिश साऊथी यांचे डोक्याला गंभीर दुखापती झाल्याने तसेच पाठीमागे बसलेली जास्मिन हिच्या डोक्यालाही गंभीर दुखापत व उजव्या हाताला फ्रॅक्चर होऊन दुखापती झाल्याने महामार्ग पोलिसांच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक गीतांजली जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ऐनघर मदत केंद्रातील पोलिस कर्मचाऱ्यांनी या दोघांना उपचारासाठी सुकेळी येथील बी सी जिंदाल हॉस्पिटल मध्ये नेले. जखमींना डॉक्टरांनी तपासले असता त्यांनी मोटरसायकल चालक क्रिश साउथी (नेपाळी) यास मृत घोषित केले. तर जखमी जास्मिनवर जिंदाल हॉस्पिटल येथे अधिक उपचार सुरू आहेत. अपघातग्रस्त वाहन रस्त्याचे बाजूला करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. या अपघाताची नोंद नागोठणे पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास नागोठणे पोलीस करीत आहेत.
सुकेळी खिंडीत मोटारसायकल अपघात; तरुणाचा जागीच मृत्यू
