। माणगाव । सलीम शेख ।
माणगावपासून ३ किमी अंतरावर असणाऱ्या तिलोरे गावच्या हद्दीत मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर मोटारसायकल अपघातात एकाच मृत्यू झाला. सदरची घटना शुक्रवार दि.२० जानेवारी २०२३ रोजी सकाळी ९:१५ वाजण्याच्या सुमारास घडली.याबाबतची फिर्याद प्रवीण प्रकाश जाधव(वय-२८) रा.वारक बौद्धवाडी ता.माणगाव यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.
सदर अपघाताबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि, या अपघातातील फिर्यादी प्रवीण प्रकाश जाधव यांचे मयत झालेले चुलते महेंद्र शिवराम जाधव(वय-४०) रा.वारक बौद्धवाडी ता.माणगाव हे आपले सहकारी सचिन करकरे यांच्या सोबत त्यांच्या ताब्यातील ऍक्टिव्ह स्कुटी क्रमांक एम.एच.०६ बी.वाय/०४६८ या गाडीवरून एचपी गॅसचा खाली बाटला समोरील बाजूस ठेवून गॅस भरून आणणेकरिता माणगाव वरून कोलाड येथे जात असताना मयत महेंद्र जाधव यांनी त्यांच्या ताब्यातील स्कुटी हि रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने चालवीत घेऊन जात असताना अपघात ठिकाणी आल्यावर सदरची स्कुटी घसरून त्यावरील मयत यांचा ताबा सुटल्याने स्कुटी रस्त्याच्या बाजूस असलेल्या झाडावर जाऊन धडकून अपघात घडला. या अपघातात चालक महेंद्र जाधव यांचा मृत्यू होऊन स्कुटीचे नुकसान झाले असून पाठीमागे बसलेले सचिन करकरे यांनाही किरकोळ दुखापत झाली.
या अपघाताची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात कॉ.गु.रजि.नं.११/२०२३ भादवि संहिता कलम ३०४ अ,२७९,३३७,३३८ मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे दाखल करण्यात आली आहे.सदर अपघाताचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रावसाहेब कोळेकर हे करीत आहेत.
माणगाव: मुंबई-गोवा महामार्गावर मोटारसायकल अपघात; एकाच मृत्यू
