अंगणवाडी सेविका मदतनिसांचे आंदोलन

मागण्या पूर्ण न केल्यास काम बंद करण्याचा इशारा

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

आपल्या विविध मागण्यांसाठी सोमवारी रायगड जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनिस यांनी संघटीत होऊन अलिबाग येथील प्रकल्प कार्यालयावर धडक दिली. यावेळी शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. अंगणवाडी सेविकांच्या प्रलंबित मागण्या मान्य न केल्यास काम बंद करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने जिल्हा प्रमुख दिनकर म्हात्रे, रश्मी म्हात्रे, अलिबाग तालुका प्रमुख जिवीता पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

यावेळी प्रकल्प संचालिका गीतांजली पाटील यांना निवेदन देण्यात आले. त्यानुसार गरीब, तुटपुंज्या मानधनावर काम करणार्‍या सेविकांना, नवीन मोबाईल खरेदी करून काम करण्याचे दादागिरी, प्रकल्प कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी करत आहे. अजून ही पोषण ट्रॅकर ऐप ची केस, मुंबई उच्च न्यायालयात सुरू आहे. पुढील सुनावणी 21 डिसेंबर रोजी आहे. तो पर्यंत व्यक्तिगत मोबाईल वर माहिती भरू नये. ज्या प्रकल्पातील अधिकारी व कर्मचारी दडपशाही करतील, त्या प्रकल्पात अंगणवाडी कर्मचारी बेमुदत ठिय्या धरणे आंदोलन करतील असा इशाराही देण्यात आला. तातडीने निर्णयाची अंमलबजावणी शासनाने करावे या व इतर मागण्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यात आले.

अंगणवाडी कर्मचा-यांची मागणी आहे की, योजनेच्या कामासाठी त्यांना शासनाकडून मोबाईल देण्यात यावा, त्यांना त्यांच्या वैयक्तिक मोबाईल मध्ये काम करण्याची सक्ती करण्यात येवू नये, मोबाईल रिचार्जसाठी 2021 पासून खर्च झालेले पैसे देण्यात यावे. 2021 पासूनची अंगणवाडीच्या भाडयाची रक्कम देण्यात यावी. 2017 पासून सेवानिवृत्त करण्यात आलेल्या सेविकांना एक लाख व मदतनिसांना 75 हजार रू. शासन आदेशानुसार रक्कम देऊन त्यांची म्हातापरणी होणारी उपासमार थांबवावी. तसेच वर्षानुवर्षे अंगणवाडी कर्मचा-यांची रिक्त पदे भरण्यात यावी, अशा अंगणवाडी कर्मचा-यांच्या अनेक मागण्या आहेत.

Exit mobile version