पर्यावरणपूरक आकाश कंदीलांची चलती

| पनवेल । वार्ताहर ।
दिवाळीत आकाश कंदिलाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. कोरोना काळानंतर यंदा निर्बंधमुक्त सण साजरा होत असल्याने बाजार सजू लागला आहे. सध्या बांबूंपासून वेगवेगळ्या नक्षीमध्ये बनवलेल्या पर्यावरणपूरक आकाश कंदिलांना ग्राहकांची पसंती मिळत असून त्यांचे नावीन्यपण अनेकांना आकर्षित करत आहे.

दिवाळी काही दिवसांवर आल्यामुळे आतापासूनच आकाश कंदील खरेदी केले जात आहेत. अशातच कोरोनाकाळामध्ये सणांवरील निर्बंधांमुळे या उत्साहावर देखील मर्यादा आली होती. यंदा मात्र निर्बंधमुक्त सण साजरा होणार असल्याने आदिवासी भागातून पर्यावरणपूरक आणि बांबूपासून आकर्षक आकाश कंदील बनवण्याचे काम सुरू आहे. यंदा बांबूपासून तयार केलेल्या आकाश कंदिलांना अधिक मागणी आहे. अतिशय सुबक व बारीक काम, उत्कृष्ट पद्धतीचे बांबूची रंगसंगती करून केलेले नक्षीकाम व रंगीत धाग्यांच्या सजावटीमुळे हे आकाश कंदील आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत असून चिनी आकाश कंदिलांपेक्षा बांबूच्या कंदिलांना अधिक मागणी आहे.

कलेमुळे तरुणांच्या हाताला काम
मेस बांबू, मानवेर बांबू, कासट असे तीन प्रकारचे बांबू घेतले जातात. बांबूच्या छोट्या-छोट्या पट्ट्या तयार करतात, बांबूपासून तयार केलेल्या पट्ट्यांना पाहिजे तसा आकार दिला जातो. बांबूच्या काट्यांपासून त्रिकोणी, चौकोनी, षटकोनी, अष्टकोनी, पंचकोनी, वर्तुळाकार, अर्धगोलाकार, तसेच काहींना घरासारखा आकार दिला जातो. अशा पद्धतीचे 30 ते 35 प्रकार बनवले जातात. एका बांबूपासून 10 ते 15 आकाश कंदील तयार होतात. या कलेमुळे अनेक तरुणांच्या हाताला काम मिळाले आहे.

बाजारात विविध नावांनी ओळख
बांबूपासून बनवण्यात आलेल्या आकाश कंदिलांची वेगवेगळी नावे आहेत. त्यामध्ये गुरू, शुक्र, सप्तऋषी, ध्रुव, चांदणी, तबकडी, माऊली, मिरॅमिड्स, बिल्डिंग, कछवा असे अनेक प्रकार आकर्षक असून रंगीबेरंगी धाग्यांची वेगवेगळ्या प्रकारचे नक्षीकाम केलेले आहे. या आकाश कंदिलांची किंमत 300 ते 500 रुपयांपासून सुरू आहे.

पर्यावरणपूरक आकाश कंदील दिसायला सुंदर असून जास्त काळ टिकणारे आहेत. सध्या धाग्यापासून सजावट केलेल्या बांबूंच्या आकाश कंदिलाला ग्राहकांची पसंती आहे.

– दुकानदार
Exit mobile version