| महाड | प्रतिनिधी |
दीपावली म्हणजे दिव्यांचा सण. दिवाळी म्हटलं की घरासमोर असणारा आकाशकंदील, पणत्या, रांगोळी घराची शोभा वाढवतात. दिवाळीचा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे सध्या बाजारात विविध प्रकारचे आकाशकंदील विक्रीसाठी दाखल झाले आहेत. यावर्षी पैठणीचा कंदील नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.
दिवाळीच्या सणासुदीला बाजारात आकाश कंदिलांना मोठे स्थान आहे. दिवाळीसाठी संपूर्ण बाजारपेठ विविध प्रकारच्या वस्तूंनी सजते. त्यात विविध रंगांचे आकर्षक कंदील ग्राहकांचे लक्ष वेधून घेतात. बाजारात कागदी, प्लास्टिक, ग्लासपासून बनवलेले आकाश कंदील आहेत. ग्राहकांकडूनही या आकर्षक कंदिलांना मोठी मागणी आहे. इतर साहित्यापासून तयार केलेल्या कंदिलांसह मातीचे कंदील विकत घेण्यास ग्राहक प्राधान्य दर्शवत असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.
अनेक वर्षांपूर्वी बांबूच्या काठ्या आणि कागद यांच्या मदतीने घरातच बनवलेले कंदील वापरले जात. नंतर त्यांची जागा प्लास्टिकच्या कंदिलांनी घेतली; परंतु गेल्या काही वर्षांत पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्याबाबत जनजागृती होत असल्याने नागरिक कापडी कंदिलांसह इतर पर्यावरणपूरक कंदिलांना प्राधान्य देत आहेत. त्यातच काही ग्राहक एकदा वापरता येईल असा कंदील खरेदी करत आहेत. त्यासाठी विविध प्रकारचे कंदील बाजारात दाखल झाले आहेत. 20 ते 25 वर्षांपूर्वी कागदापासून तयार केलेले आकाशकंदील मिळत असत. तेच आकाशकंदील बाजारपेठेत फेरफटका मारताना जास्त प्रमाणात दिसून येत आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या आकाशकंदिलांचे 50 रुपयांपासून ते 1200 रुपयांपर्यंत दर आहेत. त्याचबरोबर दारासमोर लावण्यासाठी लहान आकाश कंदिलांनाही ग्राहकांकडून मागणी असल्याचे विक्रेते सांगतात.
प्लास्टिकचे छोटे आकाश कंदील 60 रुपये डझन विकले जात आहेत. वेगवेगळे रंगीबेरंगी, प्लास्टिकच्या वापराने तयार करण्यात आलेले आकाशकंदील ही विक्रीसाठी आलेले आहेत. डेकोलाइट, स्केअर, लोटस, चांदणी, प्लॉअर, अनार करंजी, बलून या पद्धतीच्या आकारातील कंदिलांनी बाजारपेठ सजली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र असलेले कंदील ही आहेत. शहरातील मुख्य बाजारपेठेबरोबर महाड औद्योगिक वसाहत, बिरवाडी, पोलादपूर शहर, कापडे या भागात कंदील विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत थोडा दर वाढलेला असल्याचे विक्रेते सांगतात. आकाशकंदीलचे दर वाढलेले असले, तरी ग्राहकांकडून कंदील घेण्यासाठी प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.







