‘एमपीएससी’च्या विद्यार्थांना महागाईचा फटका

।पुणे । वृत्तसंस्था ।
कोरोनानंतर सर्वच वस्तू व इतर गोष्टींचे दर वाढत असल्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांच्या खिशाला फटका बसू लागला आहे. उपनगरांच्या तुलनेत शहराच्या मध्यभागात वास्तव्य करण्यासाठी महागाईच्या झळा बसत आहेत. कोरोनानंतर सदनिका, मेस, अभ्यासिका, शिकवण्या यांच्यात झालेल्या भरमसाट वाढीने एमपीएससीचे विद्यार्थी त्रस्त झाले आहेत.सदाशिव, शनिवार, नारायण, बुधवार पेठ, टिळक रस्ता आदी भागांत स्पर्धा परीक्षांचे अनेक क्लास असल्याने राज्यातील अनेक भागांतील विद्यार्थी येथे अभ्यास करण्यासाठी येतात. येथे अभ्यासिका आणि खानावळींची संख्याही मोठी आहे. तसेच सदनिकाही पेठ भागात मोठ्या संख्येने भाडेतत्त्वावर उपलब्ध आहेत. त्यामुळे साहजिकच येथे विद्यार्थ्यांची राहण्याला पसंती मिळते. ही संख्या लाखाच्या आसपास जाते. मात्र, गेल्या काही महिन्यांत क्लास, खानावळी, सदनिकांच्या झालेल्या दरवाढीने विद्यार्थ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
कोरोनानंतर सर्वच क्षेत्रात दरवाढ होत आहे. त्यातच विद्यार्थी पुन्हा परतू लागल्याने वसतिगृहचालक, सदनिका मालक त्याचा फायदा घेत आहेत. तसेच क्लासची फी वाढत आहेत. खानावळी व अभ्यासिकाही त्यांना अपवाद नाहीत. प्रति विद्यार्थी दरमहा हा खर्च 10 ते 15 हजारांच्या आसपास जात आहे. परिणामी अनेक विद्यार्थी मध्यभागातून उपनगरांत शिफ्ट होऊ लागले आहेत.

Exit mobile version