। मुंबई । प्रतिनिधी ।
महावितरणच्या विविध परिमंडलात कृषी ग्राहकांसाठी वीजबिल दुरुस्ती शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहेत. महावितरणच्या भांडूप परिमंडळांतर्गत अलिबाग, कर्जत-खालापूर तसेच श्रीवर्धन येथे सदर शिबीर घेण्यात आले असून या शिबिराला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. मोठया संख्येने कृषी ग्राहकांनी उपस्थित राहून वीज देयकाची दुरुस्ती करुन घेतली आहे. सदर कार्यक्रम भांडूप परिमंडलाचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर व इब्राहीम मुलाणी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला असून कार्यकारी अभियंता, गणेश पाचपोहे, अभियंता शिवाजी वायफळकर व चांदपाशा इनामदार यांनी कार्यक्रमाची रूपरेषा तयार करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.
अलिबाग, कर्जत-खालापूर व श्रीवर्धन येथील कृषीपंप ग्राहकांच्या वीजबिल दुरुस्तीसाठी अनुक्रमे दि. 11 ते 15 मार्च रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 यावेळेत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरामध्ये ग्राहकांच्या मंजूर वीजभार, मीटर वाचन, थकबाकी इत्यादी स्वरूपाच्या सर्व तक्रारींचे योग्य प्रकारे निराकरण करण्यात आले.
अलिबाग, कर्जत-खालापूर व श्रीवर्धन येथील शिबिरांत एकूण 413 कृषी ग्राहक सहभागी झाले होते. यापैकी 196 ग्राहकांच्या विजबीलाबाबतच्या तक्रारींचे निराकरण करण्यात आले. 249 ग्राहकांचे वीज बिल दुरुस्त करण्यात आले. एकूण 143 ग्राहकांनी 3,06,477 रुपयांचा वीज बिल भरणा केला. 172 ग्राहकांनी आपला मोबाइल क्रमांक अद्ययावत केला. 158 ग्राहकांनी आपल्या वीजमीटर बाबत तक्रारी दाखल केल्या.