महावितरण विरोधात नागरिकांमध्ये असंतोष; पनवेल मनसेने दिला महावितरणला इशारा
। पनवेल । साहिल रेळेकर ।
ग्राहकांना कोणत्याही पूर्वसूचना न देताच महावितरण कंपनीतील कर्मचारी परस्पर मीटर काढत असल्याचा संतापजनक प्रकार पनवेलमध्ये घडला. थकित बिल असल्यास कोणतीही कल्पना न देताच मीटर काढून घेऊन जाणे हे वारंवार घडत असल्याचा आरोप मनसेचे पनवेल तालुका चिटणीस सुजित सोनावणे यांनी केला आहे.
राज्यात कोरोनाच्या महामारीत गेली दोन वर्षे अनेकांच्या नोकरीवर गदा आली आहे. व्यापारी, धंदेवाईक, हॉटेल व्यावसायिक यांच्यासह सर्वसामान्य नागरीकही आर्थिक मेळ बसविण्यात अक्षरशः मेटाकुटीला येऊन हतबल झाले आहेत. अशातच महावितरणकडून विजप्रवाह खंडीत करून मीटर काढण्याचा जोरदार सपाटा पनवेलमध्ये सुरू असल्याचे वीज ग्राहकांककडून बोलले जात आहे.
याबाबत अनेकांनी मनसे आदईगड जनसंपर्क कार्यालयामध्ये तक्रारी दिल्या होत्या.त्यानुसार शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता पनवेल मनसेच्या शिष्टमंडळाने महावितरण कंपनीमध्ये जाऊन वरिष्ठ अभियंत्यांची भेट घेतली. या दरम्यान वरिष्ठ अधिकार्यांना निवेदनही देण्यात आले.
वरिष्ठ अधिकार्यांनी याविषयी लक्ष घालून कर्मचार्यांना योग्य सूचना द्याव्यात असे सांगून मनसेचे पनवेल तालुका चिटणीस सुजित सोनावणे यांनी वीज महावितरण कंपनीला इशारा दिला आहे. यापुढे असे प्रकार घडणार नाहीत, असे आश्वासन अधिकार्यांनी दिले आहे. यावेळी मनसे तालुका अध्यक्ष अविनाश पडवळ, तालुका चिटणीस सुजित सोनावने, आदई विभाग अध्यक्ष विलास भेरे, महाराष्ट्र सैनिक सुनील बनसोडे, सुरेश चवरे यांच्यासह आदी उपस्थित होते.