लालपरी पुन्हा धावणार?

। मुंबई । प्रतिनिधी ।
एसटी कर्मचार्‍यांच्या संपावर मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त  केल्याने कर्मचारी संघटनेचे नेते अजय गुजर यांनी रात्री संप मागे घेतल्याचे घोषित केले.मात्र आझाद मैदानावर उपोषणाला बसलेल्या एसटी कर्मचार्‍यांनी अजय गुजर यांची संप मागे घेण्याच्या निर्णयाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करीत आम्ही विलिनीकरणाच्या मुद्यावर ठाम असून,त्याचा जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत संप सुरुच राहील असे जाहीर केल्याने संप मिटणार की सुरुच राहणार याबाबत साशंकता निर्माण झालेली आहे.
गेले 45 दिवस हा संप सुरु झाल्याने राज्यातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय निर्माण होऊ लागलेली आहे.सोमवारी याबाबत उच्च न्यायावलयाने नाराजी व्यक्त केली.त्यामुळे संघटनेचे नेते अजय गुजर यांनी संप मागे घेत असून,22 डिसेंबरपासून कर्मचारी कामावर रुजू होतील असे जाहीर केले.मात्र इकडे आझाद मैदानात संप करणार्‍या कर्मचार्‍यांनी गुजर यांचा निषेध व्यक्त केला.जोपर्यंत विलिनीकरण होत नाही तोपर्यंत आम्ही संप मागे घेणार नाही,असे  काही कर्मचार्‍यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.दरम्यान,यावरुन संपकरी संघटनांमध्ये फूट पडल्याचे दिसत आहे.आता संप मिटणार की सुरुच राहणार याबाबत साशंकता निर्माण झालेली आहे.

Exit mobile version